कोल्हापूर - गारगोटी शहरात सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचा रुबाब दाखवून पोलीस खात्यात नोकरी लावतो, अशी बतावणी करून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया सीआयडी इन्स्पेकटर युवतीस व तिच्या मामाला पोलिसांनी गजाआड केले. या मामा-भाचीने भुदरगड तालुक्यातील अनेक युवक, युवतींना नोकरीच्या बहाण्याने लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. प्रियांका प्रकाश चव्हाण (22 वर्षे) व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण (38 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
2 वर्षांपूर्वी गारगोटी शहरात जोतिबा चौकात या तरुणीचे पोलीस खात्यात नोकरी लागल्याचे डिजिटल बोर्ड लागले होते. या माध्यमातून तिने आपण सीआयडी इन्स्पेक्टर असल्याचे भासवून सत्कार करून घेतले होते. तिच्या या खेळीवर लोकांचा विश्वास बसला. या माध्यमातून पोलीस खात्यात नोकरी लावतो, म्हणून पैसे उकळण्याचा धंदा सुरू करून लाखो रुपये जमा केले.
25 जुलै रोजी भुदरगड तालुक्यातील निळपण येथील प्रतीक्षा साळवीकडून प्रियांका व तिच्या मामा विठ्ठल याने दहावी बारावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला तसेच 5 लाख 25 हजार रुपये घेतले यानंतर तिला सीआयडी विभागाचे बनावट ओळखपत्र दिले. याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात प्रतीक्षाने फिर्याद दिली असून याप्रकरणी प्रियांका व तिचा मामा विठ्ठल मारुती निलवर्ण या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.