कोल्हापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून चीन देशातील वस्तूंना देशभरात विरोध होताना पाहायला मिळत आहे. शिवाय चीनकडून सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांनी देखील चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. त्याला आता भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातही चिनी वस्तूंना विरोध होत आहे. शिवाय, आमचेच पैसे आमच्याविरोधात लढाईसाठी वापरत असतील, तर आम्ही चिनी वस्तू का खरेदी करायच्या? असे म्हणज कोल्हापूरकरांनी 'बॉयकॉट मेड इन चाईना' या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा... कोरोना इफेक्ट : वारीत गजबजणारे इंद्रायणीचे घाट भक्तांंविना सुने
कोल्हापूरात शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून विविध संघटनांनी चीनहून येणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. त्यामुळे सामान्य नागरिक देखील आता या वस्तू विकत घेण्याऐवजी भारतीय वस्तूंना प्राधान्य देत आहेत. कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त सुविधा मिळतात म्हणून बाजारपेठेत चायनीज मोबाईलला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, आता दुकानदारच 'बॉयकॉट मेड इन चाईना प्रॉडक्ट्स' ही मोहीम सुरू करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे लहान मुलांची बहुतांश खेळणी सुद्धा चाईना वरून येत असतात.
'चायनीज वस्तू जरी कमी किमतीत मिळत असतील, तरी त्यांचे आयुष्य जास्त नसते' हेच सांगत कोल्हापूरातील व्यापारी आता भारतीय वस्तू विकण्यावर जास्त भर देत आहेत. चीन येथील वस्तूंना पर्याय म्हणून दिल्ली, मुंबई बाजारपेठेतून येणाऱ्या खेळण्यांना ते पसंती देत आहेत. शिवाय एकीकडे नागरिकांचाच विरोध होत असेल, तर आम्ही दुकानात चाईना वस्तू का ठेवू? असेही ते म्हणत आहेत.
कोल्हापूरात शहरात मागील 4 ते 5 दिवसांपासून विविध संघटनांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सामान्य नागरिक सुद्धा आता या वस्तू विकत घेताना, चायनीज वस्तूऐवजी भारतीय वस्तूंना प्राधान्य देत आहेत. शिवाय 4 पैसे वाढवून जरी गेले, तरी आम्ही भारतीय वस्तूच घेणार, असेही काहीजण म्हणत आहेत.
हेही वाचा... चारित्र्याच्या संशयावरून सासरच्यांनी केले महिलेचे मुंडन; कोल्हापूरातील तेरवाडमधील घटना
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सकडून तर 'बॉयकॉट मेड इन चाईना प्रोडक्ट' ही मोहीमच हाती घेण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानदारांना याचे महत्व पटवून देण्यात येणार असून त्यांच्या दुकानांवर तसे स्टिकर सुद्धा लावण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संजय शेटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. तसेच काही चायनीज इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तू लगेचच बदलता येणार नाहीत. त्याच्या बदल्यात भारतीय बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जातील. ग्राहकांनी मात्र भारतीय वस्तूंचीच खरेदी करून व्यापारी वर्गाला सहकार्य करण्याची गरज असल्याचेही शेटे यांनी म्हटले.
जिल्ह्यात दररोज 10 ते 20 कोटींची उलाढाल...
कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारपेठेचा विचार केला, तर दररोज 150 ते 200 कोटींहून अधिकची उलाढाल दररोज होत असते. त्यातील चायनीज वस्तूंची विक्रीतून अंदाजे 10 ते 20 कोटी रुपये इतकी उलाढाल होत असते. सध्या लॉकडाऊनमध्ये ही आकडेवारी खूप कमी झाल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. दररोज होणाऱ्या उलढालीमध्ये मोबाईल, लॅपटॉप, कटलरी साहित्य, लहान मुलांची खेळणी, लाईट्स, साउंड सिस्टीम आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याशिवाय सनासुदीच्यावेळी सुद्धा फटाके, आकाश कंदील, प्लास्टिक बंदुका अशाप्रकारच्या चायनीज वस्तूंची कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असते.