कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणच्या गर्दी पाठोपाठ अत्यंसस्कारासाठी होणारी गर्दीही टाळावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस लोकांनी उपस्थित राहावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये अत्यंसस्कार, रक्षाविसर्जन, दफनविधी आदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही गर्दी टाळणेही महत्त्वाचे आहे. गेल्या आठवडाभरात शहरात दोन ठिकाणी मृतदेहावर अत्यंसंस्कार करून आल्यानंतर संबंधित मृत व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या नागरिकांना संसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांनी प्रत्यक्ष अंत्यसंस्काराला जाणे टाळावे. मृताच्या नातेवाईकांची फोनवर विचारपूस करून सांत्वन करावे. कोणत्याही कारणाने एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर त्याच्या अंत्यविधीसाठी केवळ वीसच लोकांनी उपस्थित रहावे. जे उपस्थित राहतील त्यांनीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
ज्या रुग्णांनी खासगी प्रयोगशाळेतून स्वॅबची तपासणी केली आहे, अशा रुग्णांनी अथवा संबंधित लॅब धारकांनी पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती महानगरपालिकेला कळवणे बंधनकारक आहे. ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आला आहे.