कोल्हापूर - आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. टाळ, मृदुंग आणि विठू माऊलींच्या गजरात आज उभी पंढरी न्हाऊन निघते. अशाच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या गावी देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील यात्रा रद्द करण्यात आली आहे.
केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात कोल्हापुरातून एका ट्रकमधून ज्ञानेश्वरांची पालखी नंदवाळकडे रवाना झाली. नंदवाळ येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. कोल्हापूर येथून प्रतिवर्षी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जात असते. या दिंडीत शंभरहून अधिक गावातील दिंड्या सहभागी होत असतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा सुरू आहे. कोल्हापूरातील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरातून दरवर्षी ज्ञानेश्वरांची पालखी निघत असते. ही पालखी वाशी मार्गे प्रति पंढरपूर नंदवाळला जाते. शिवाय पंढरपूर प्रमाणेच कोल्हापूरातील पुईखडी याठिकाणी असलेल्या मैदानात रिंगण सोहळा सुद्धा मोठ्या उत्साहात संपन्न होतो.
सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक उपस्थित असतात. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होऊन नंदवाळ या गावी असलेल्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवली जाते. यावर्षी देशभरात कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले आहे. यामध्ये सर्व धार्मिक स्थळे अद्यापही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेऊन यंदा प्रतिपंढरपूर नंदवाळची यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नंदवाळ यावर्षी भक्तांविना सूने पडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भाविक नंदवाळकडे येऊ नयेत यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला असून येणाऱ्या भाविकांना पुन्हा परत पाठवत आहेत.