कोल्हापूर - सध्या सुरू असलेली लढाई मोदी सरकार विरोधात सुरू नाही तर कोरोनाशी आहे. त्यामुळे कोरोनाशी लढायचे की घाबरायचे असा विचार करण्याची आवश्यकता आहे.अकार्यक्षमता लपविण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांचे आणि त्यांच्या प्रमुखांचे केंद्र सरकारकडे बोटे दाखवणे सुरू आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सीपीआर हॉस्पिटलला भेट देऊन तिथल्या सुविधांची सुद्धा पाहणी फडणवीस यांनी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. सध्याचा कोल्हापूरमधील केस पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 8 दिवसात तो 25 ते 30 टक्क्यांवर होता. कोरोना मृत्यू दर सुद्धा 3 टक्क्यांवर पोहोचला असून राष्ट्रीय सरासरीपेक्षा तो जास्त आहे तर राज्याच्या सरासरीबरोबर आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ही परिस्थिती खूप गंभीर असून प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला असल्याचे दिसून येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा-जीएसटी मोबदला: कर्ज घेण्याचे केंद्राचे पर्याय राज्यांनी नाकारावेत - पी. चिदंबरम
कोल्हापूर प्रशासनाने कोविड सेंटरची व्यवस्था अतिशय चांगली केली आहे. मात्र, वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याने काम चालणार नाही. मोठ्या संख्येने आयसीयू बेडची व्यवस्था करण्याची आता आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. जिल्हाधिकारी देसाई यांनी सुद्धा याबाबत राज्यसरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचे फडणवीस यांनी सांगतिले. 400 ऑक्सिजन आणि 300 आयसीयू बेडची व्यवस्था व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने सुद्धा याला विना विलंब, तात्काळ मंजुरी देण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत याचा विचार केला तर रोज 20 टक्के रुग्णांना उपचाराची गरज लागणार आहे. त्यातील 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज लागणार आहे तर 2 ते 3 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर लागेल. त्यामुळे यामध्ये अधिक वेळ घालवला तर मृतांच्या संख्येत वाढ होईल, अशी भीती फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती देणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
प्रशासनाचे कौतुक आणि सूचना
कोल्हापुरातील कोविड सेंटरची व्यवस्था प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. शिवाय सीपीआर हॉस्पिटलमध्ये बसविण्यात आलेल्या 20 हजार लिटर ऑक्सिजन टँकची व्यवस्था हा चांगला बदल याठिकाणी पाहायला मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने अधिक चांगल्या सोयी देण्यासाठी तसेच रुग्णांसाठी आणखी 400 ऑक्सिजन बेड आणि 300 आयसीयू बेडची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.