कोल्हापूर - बापाने कानाखाली मारल्याने भिंतीवर डोके आदळून एका सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात घडली आहे. पोटच्या मुलीचा समोर झालेला अंत पाहून आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यामुळे कसबा बावडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनन्या मंगे असे या मुलीचे नाव असून तानाजी दिलीप मंगे असे तिच्या बापाचे नाव आहे. पोलिसांनी या निर्दयी बापाला अटक केली आहे.
कसबा बावड्यातील जयभवानी गल्लीत राहणाऱ्या तानाजी मंगे याच्या कुटुंबातील सहा वर्षीय मुलगी अनन्याचा मृत्यू झाला. ती चक्कर येऊन पडून गंभीर जखमी झाली असे सांगण्यात आले होते. परंतु, यामध्ये शंका असल्याची चर्चा परिसरात सुरु होती. याचा शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासानंतर बापानेच कानाखाली लावल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले.
हेही वाचा - गृहमंत्र्यांनी घेतली 'त्या' आजींची भेट.. साडी चोळी आणि एक लाखांची मदत
काही कारणात्सव बापाने तिच्या कानशिलात लगावली. त्यामुळे ती बाजूच्या भिंतीवर आदळून खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तानाजीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच पोटच्या मुलीचा मृत्यू झाल्याची त्याने कबुली दिली. तानाजी मंगे याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.