कोल्हापूर - छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सीपीआर) अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांची शुक्रवारी तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. जयप्रकाश रामानंद नवे अधिष्ठातामधून आजपासून (शनिवार) रुजू होत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 महिन्यांपासून सीपीआर रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. मात्र, सुरुवातीपासूनच सीपीआर प्रशासनाकडून कोरोनाग्रस्त रुग्णांच्या बाबत अधिकृत माहिती दिली जात नव्हती. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने 18 मे रोजी 'सीपीआर रुग्णालयाचा सावळा गोंधळ जिल्हा व्हेंटिलेटरवर' अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती.
हेही वाचा - कोरोनासंदर्भात राज्य शासनास योग्य निर्देश द्या; दरेकरांचे राज्यपालांना विनंती पत्र
सीपीआरच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये एका कोऱ्या कागदावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती देत होत्या. एकीकडे भारतावरच नव्हे तर, संपूर्ण जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट आहे. या परिस्थितीत रुग्णांबाबत तत्काळ आणि अधिकृत माहिती मिळणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याकडून चक्क कोऱ्या कागदावर माहिती दिली जात होती. 'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर त्यामध्ये थोडी सुधारणा झाली. मात्र, पुन्हा 'जैसे थे' प्रकार सुरू झाला. या पार्श्वभूमीवर त्यांची शुक्रवारी जळगाव येथे बदली करण्यात आली.
सीपीआरची इत्यंभूत माहिती असणारे आणि प्रशासनावर चांगला वचक ठेवणारे म्हणून डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या येण्याने निश्चितच सीपीआर प्रशासन आणखीन गतिमान होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूरात सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णांची संख्या खूपच कमी होती. मात्र, जेव्हापासून इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या कोल्हापूरवासीयांना कोल्हापुरात परत येण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर मात्र, कोल्हापूरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच गेली. सध्या कोल्हापूरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास 240च्या वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घरी जाऊ न देता संस्थात्मक अलगीकरण केले जात आहे, त्यामुळे ही संख्या वाढू न देण्यात जिल्हा प्रशासनाला मोठे यश आले आहे.