कोल्हापूर - स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालयाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत हातकणंगले पंचायत समिती सदस्य प्रवीण जनगोंडा आणि त्यांचे कार्यकर्ते महेश पांडव यांनी जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रोखल्याने पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट उडाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या सर्व प्रकारामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये एकच गोंधळ उडाला.
आंदोलक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पंचायत समिती सदस्य प्रवीण जणगोंडा यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण जणगोंडा हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालय कामांमध्ये अडीच कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत आहेत. या कामाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी सीईओंकडे केली होती. मात्र, याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नव्हती. अखेर यावर नाराजी व्यक्त करत प्रवीण जणगोंडा यांनी पोष्टरबाजी आंदोलन केले. संतप्त झालेल्या आंदोलकांनी थेट सीईओंच्या कार्यालयाबाहेर अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि त्यांच्यात मोठी झटापट झाली. संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून त्यांच्याकडून रक्कम वसूल करावी, अशी मागणी जणगोंडा यांनी केली. तसेच 21 डिसेंबर अखेर न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.