कोल्हापूर - येथील कोरोनाची परिस्थिती गंभीरच आहे. एका रुग्णाचा जरी कोरोनाने मृत्यू होत असेल, तर ते गंभीरच आहे. त्यामुळे यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे. कोरोना परिस्थितीची आढावा बैठक झाल्यानंतर ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काल गुरुवारी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक कोल्हापूरमध्ये आले होते. त्यांनी कोल्हापूरमधील परिस्थिती गंभीर नाही, असे म्हटले होते. यावर बोलताना कोल्हापूरमधील परिस्थिती गंभीर असल्याचे मत टोपे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे टोपे यांनी थेट केंद्रीय पथकाचा मुद्दा फेटाळून लावला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर त्रुटी दुरुस्त करून कशा पद्धतीने पॉझिटिव्हिटी रेट कमी करता येईल, याबाबत नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
'आरोग्यमंत्र्यांकडून जिल्हयाचे कौतुक'
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असली, तरी जिल्ह्यातील लसीकरणाची परिस्थिती अतिशय चांगली आहे. जिल्हा प्रशासनाचे याबाबत कौतुक केले पाहीजे. तसेच, जिल्ह्यातील सर्वच उद्योजकांनी आपल्या कामगारांना लस देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचेही कौतुक करत, या उपक्रमाचे राज्यातल्या इतर उद्योजकांनीही अनुकरण करायला हवे असे मत टोपे यांनी व्यक्त केले आहे. राज्याला जास्तीत जास्त लस कशी उपलब्ध करून घेता येईल, याबाबतही वारंवार पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
'तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची जास्त गरज भासू शकते'
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागली होती, त्यापेक्षाही जास्त ऑक्सिजनची गरज तिसर्या लाटेत भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तिसरी लाट जरी आली तरी उद्योग बंद होऊ नयेत, म्हणून कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. त्यांच्या सीएसआर फंडाचा यासाठी वापर करू शकतो. शिवाय कारखान्यांनी कामगारांची व्यवस्था त्या ठिकाणीच करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जरी तिसरी लाट आली तरी, औषधोउपचारासाठी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात 1222 कोटींची मंजुरी करून घेतली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यात आजपर्यंत जो काही ऑक्सिजन लागत होता, त्यापेक्षा तीन पट जास्त ऑक्सिजन लागू शकतो, त्याची तयारी केली आहे. राज्यात एकूण 9 हजार 46 इतके म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत त्यातल्या 5 हजार 400 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
'व्यवसाय सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावा'
कोणत्याही परिस्थितीत व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दुकान सुरू करण्याचा निर्धार केला आहे. याबाबत विचारले असता, सर्वांनाच व्यवसाय सुरू व्हावेत असे वाटत आहे. आम्हालाही व्यवसाय सुरू व्हावेत असे नक्कीच वाटते. मात्र, नियमांचे कशा पद्धतीने पालन करता येईल, कशा पद्धतीने वेळ ठरवावी? याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य ती भूमिका घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करेल, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता व्यवसाय सुरू होणार, की नाही हे मात्र अजूनही अस्पष्टच आहे.