कोल्हापूर - मरकझहून आलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोनाबाधित तरुणाच्या चुलत भावाला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास सीपीआर प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 'त्या' रुग्णाच्या चुलत भावाचा कोरोनाअहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.
मरकझहून जिल्ह्यात आलेल्या उचत येथील तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील इतर सर्वांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात या तरुणाच्या २४ वर्षीय चुलत भावाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. मात्र 'त्या' रुग्णाच्या वडिलांचा आणि आणखीन एका भावाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
शाहूवाडी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 वर गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली असून त्यापैकी भक्तीपूजा नगरमधील बहिण-भाऊ कोरोनामुक्त झाले आहेत.
कोल्हापुरातल्या वडगावमधील तरुणीचा रिपोर्ट सांगलीमध्ये येतो. त्यामुळे त्या तरुणीसह कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 7 होते. ती तरुणी सुद्धा कोरोनामुक्त झाली आहे.