कोल्हापूर - शहरातील सब जेलमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला आहे. कारागृहातील तब्बल ३१ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक विजय झेंडे यांनी दिली आहे. ८५ कैद्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील ३१ जण बाधित झाले आहेत.
शहरातील सब जेलमध्ये 199 पुरुष आणि 19 महिला कैद आहेत. ५ एप्रिल रोजी या कारागृहातील दोन कैद्यांना तपासणीसाठी इचलकरंजीला नेण्यात आले होते. त्यामुळे परत कारागृहात येताना सर्वांची आरटीपीसीआर कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी एका कैद्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कातील ८२ कैद्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. शनिवारी रात्री कारागृह प्रशासनाला अहवाल प्राप्त झाला. त्यातील ३१ जण बाधित झाले आहेत. त्यानंतर तातडीने कारागृहात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. सदर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर कारागृहातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला हादरा बसला आहे. यामध्ये तब्बल ३१ कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. तर ५१ जणांचे निगेटिव्ह आले आहेत.