कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे गुजरात दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर या निकाला विरोधात त्यांनी गुजरात सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने देखील हा निकाल कायम ठेवला. यामुळे त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेत या निकालाला आव्हान दिले. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने देखील शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे.
तोंडे बंद करण्याची गुजराती स्टाईल : भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर खोट्या केसेस करून त्यांची तोंडे बंद करण्याची गुजराती स्टाईल देशाला आता माहीत झाली आहे. मोदी आणि अदानींच्या भ्रष्ट युतीचा भंडाफोड राहुल गांधी यांनी केला. यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप करत खटला दाखल करून त्यांची खासदारकी रद्द केली. हा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे म्हणत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार पी. एन. पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भविष्यात राहुल गांधी हा एक पर्याय : यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांना दिलासा दिला नाही. राहुल गांधी यांनी भाजपच्या विरोधात आवाज उठवला आणि यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून लोकसभेमध्ये करण्यात आला. भाजपकडून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात काँग्रेस या देशात नेहमीच लढा देत आहे. मात्र, आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने सुरू आहे. राहुल गांधी यांचा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे हे भाजपला बघवत नाही. भविष्यात राहुल गांधी हा एक पर्याय देशासमोर असणार आहे. भाजपला माहीत आहे म्हणून त्यांचा लोकसभेत आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशी टीका आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे.
देशात हुकूमशाही राबविणारे मोदी सरकार : राहुल गांधी यांची चुकीच्या पद्धतीने खासदारकी रद्द केली आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली. या देशात अनेक लोकांचे खून झाले. मात्र, त्यांना निर्दोष सोडण्यात आले. राजीव गांधींचा खून झाला तेव्हा देखील राजीव गांधी यांच्या खुनीला निर्दोष सोडण्यासाठी गांधी परिवाराने सांगितले. परंतु, काही जण हजारो कोटी रुपये चोरून बाहेरच्या देशात पळून गेले आणि त्यांना चोर म्हटल्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आली. देशामध्ये लोकशाही राहिली नसून हुकूमशाही राबविणारे मोदी सरकार आले आहे. देशाचा विकास करण्याचे सोडून मोदी सरकारने देशातील सहा कंपन्या विकण्यासाठी त्यांचे टेंडर काढले आहे. गेल्या 70 वर्षांत असे कधीच घडले नाही. मोदी सरकारने स्वतः तर एकही कंपनी उभारली नाही; मात्र अगोदर असलेल्या कंपन्या विकत चालले आहेत. शिवाय ईडी, सीबीआयची धमकी द्यायची आणि आपल्या पक्षात घ्यायचे काम भाजप करत आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत, असे आमदार पी. एन. पाटील म्हणाले आहेत.