कोल्हापूर - पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आता पाण्यावरुन संघर्ष सुरू झाला आहे. इचलकरंजी शहराला पाणी देण्यावरुन सहा तालुक्यात विरुद्ध इचलकरंजी असा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. पाहूयात यावरचा 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट....
पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची राज्यात एक वेगळी ओळख आहे. जिल्ह्यामध्ये दरवर्षी सरासरी पाच हजार मिलिमीटर पेक्षाही अधिक पाऊस पडतो. मात्र तरीही ही इचलकरंजीला पाणी देण्यावरुन आता संघर्ष निर्माण झाला आहे. इचलकरंजी शहरालगतच पंचगंगा नदी वाहते. मात्र नदी प्रदूषित झाल्यामुळे इचलकरंजीत दुधगंगेमधून पाणी आणण्याची योजना आहे. मात्र याला जवळपास 6 तालुक्यातील नागरिक विरोध करत आहेत. कागल तालुक्याच्या सुळकुंड पाणी योजनेतून इचलकरंजी शहराला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण याला कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. मोठा संघर्ष करुन आणि शेकडो एकर जमिनी देऊन आम्ही पाणी मिळवले आहे. मग आमच्या वाट्याचे पाणी इचलकरंजी शहराला का द्यायचे, असा सवाल केला जात आहे. एकीकडे पंचगंगा नदी इचलकरंजी शहराच्या जवळ असताना सुळकूडमधून पाणी घेण्याऐवजी पंचगंगा नदीतून पाणी का घेत नाहीत, असे सुद्धा शेतकरी विचारत आहेत.
काळम्मावाडी धरण बनवण्याआधी याच भागाला पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत होता. त्यावेळी इथल्या शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीतून पाणी आणण्याचे प्रयत्न केले. मात्र त्यावेळी पंचगंगा नदीतून पाणी देण्यास सुद्धा विरोध केला गेला. मात्र इथल्या शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन करून स्वतःच्या जमीनी देऊन पाण्याची सोय करून घेतली. त्यावेळचीच आठवण करून देत आता इचलकरंजी शहराने पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवावे आणि पाण्याची सोय करावी, असे इथले शेतकरी म्हणत आहेत. आमचा विरोध असून सुद्धा इचलकरंजी पाणी योजना पूर्ण करण्याचे कोणी प्रयत्न केले तर तीव्र जनआंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिला आहे. शिवाय यामध्ये कोणतेही राजकारण न आणता आमच्या शेतीचा विचार करून आम्ही ही योजना होऊ देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. यासाठी छ. शाहू कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावं असे इथले शेतकरी म्हणत आहेत.
इचलकरंजी शहराला या अगोदर तीन पाणी योजना करण्यात आल्या होत्या. मात्र लोकांच्या विरोधामुळे त्या पूर्ण झाल्या नाहीत. आता ही चौथी पाणी योजनादेखील संघर्षात सापडली आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
धरणातील पाणीसाठा आणि पाण्याचे वर्गीकरण
धरणाची एकूण क्षमता 27.99 टीएमसी इतकी आहे. त्यातील महाराष्ट्राच्या हिस्स्याचे 23.99 टीएमसी पाणी आहे. तर कर्नाटकच्या वाट्याला 4 टीएमसी पाणी जाते. यामध्ये सिंचनासाठी सर्वाधिक पाणी म्हणजेच 15.45 टीएमसी पाणी, पिण्यासाठी 5.95 टीएमसी पाणी, औद्योगिक वापरासाठी 0.44 टीएमसी पाणी तर बाष्पीभवन व इतर 1.21 टीएमसी असे वर्गीकरण केले आहे.
काय आहे इचलकरंजी पाणी योजना ? यावर एक नजर
1) सुळकूड बंधारा सध्या महाराष्ट्र हद्दीवर शेवटचा बंधारा आहे. त्यापुढे जवळपास दीड किलोमीटरवर नवीन बंधारा बांधून इचलकरंजीची पाणी योजना प्रस्तावित आहे.
2) सुळकूड बंधाऱ्यापेक्षा एक मीटर कमी उंचीचा बंधारा बांधून तसेच आधुनिक पद्धतीने जॅकवेल बांधून पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होऊन बंधाऱ्यामागील शेतीमध्ये ते जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार.
3) आरक्षणानुसार शहरात द्याव्या लागणाऱ्या पाण्याचा धरणातून नियमित विसर्ग होईल. त्यामुळे नदी बारमाही वाहती राहील. याचा फायदा बंधाऱ्यामागील सर्वच गावच्या शेतकऱ्यांना होणार.
4) शहरासाठी राखीव 1 टीएमसी पाणी आणि तीस वर्षांनंतरची गरज आहे. त्यामुळे सध्या शहरासाठी सोडणाऱ्या पाण्यातून गरजेनुसार दररोज अर्धा टीएमसी एव्हढ्याच पाण्याचा उपसा होणार असल्याने उर्वरित शिल्लक पाण्याचा इतर गावांना लाभ होणार
5) संपूर्ण पाईपलाईन गावाबाहेरून जाणार असल्यानं कोणत्याही गावांना अडथळा होणार नाही.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीने पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सुळकूड येथून पाणी घेण्याबाबत अहवाल शासनाला पाठवला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून सुद्धा शासनाला सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला विरोध पाहता त्या सर्व नागरिकांची मते जाऊन घेतली जाणार आहेत आणि यातून मार्ग काढण्यात येणार आहे.