कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या गडमुडशिंगी गावामध्ये राहत असणारे रोहित गडकरी, ऋषिकेश गडकरी, चेतन गवळी आणि नागेश कांबळे ही मुले 16 जुलै रोजी तलावाकाठी खेळत होती. त्यावेळी त्यांना गवतामध्ये एक प्लास्टिकची पिशवी दिसून आली. त्यावेळी या चौघांनी ही पिशवी उघडून पाहिली असता त्यात सोन्याची बिस्किटे आणि सोन्याची नाणी आढळून आली.
खेळताना मिळाली सोन्याच्या बिस्किटांची पिशवी : मिळालेल्या माहिती प्रमाणे, ही घटना १६ जुलै रोजी घडली. गडमुडशिंगीतील तळ्याजवळ संध्याकाळी साडेचारच्या सुमारास रोहित विश्वास गडकरी, ऋषिकेश विश्वास गडकरी, चेतन सुभाष गवळी आणि नागेश महेश कांबळे ही लहान मुले खेळत होती. यावेळी खेळताना त्यांना गवतात प्लास्टिकची पिशवी दिसली. ती उघडून पहिली असता त्यात सोनेरी, चौकोनी लहान-मोठी बिस्किटे आणि नाणी मिळाली. त्यांनी ती पिशवी तशीच गावातीलच विश्वास गडकरी यांच्याकडे दिली. पण नंतर तळ्याकाठी सोन्याची बिस्किटे आणि नाणी असल्याची चर्चा सुरू झाली आणि ही माहिती गांधीनगर पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी गोपनीय तपास करत विश्वास गडकरी आणि सुभाष गवळी यांचे घर गाठले. यावेळी त्यांच्याकडे चौकशी करताना सोने सापडल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलिसांनी गडकरी यांच्याकडील सर्व सोने ताब्यात घेतले.
पोलिसांचा तपास सुरू : पोलिसांनी सर्व सोने खरे आहे की नाही, याची शहानिशा करण्यासाठी गांधीनगर येथील एका ज्वेलरी दुकानातून तपासणी केली. त्यावेळी सोने खरे असल्याचे सिद्ध झाले. या पिशवीत ३२९.४०० ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे, १० ग्रॅम वजनाची ४ सोन्याची बिस्किटे तसेच १० ग्रॅम वजनाची २ नाणी आणि ५ ग्रॅम वजनाचे एक नाणे असे एकूण ३९४.४०० ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले. ही सोन्याची बिस्किटे, नाणी कोणाची आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद झाली आहे तर हे सोने कोणाचे आहे हे अद्याप समजू शकले नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.