कोल्हापूर - बांधकामासाठी पाणी लागते. त्यासाठी बांदकामाच्या जागेत खड्डा करुन तिथे साठवण टाकी आधी बांधली जाते. मात्र हीच साठवण टाकी एका बाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरली आहे. बांधकामासाठी पाणी साठवणूक करून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापुरातील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील सुदान फार्मा कंपनीमध्ये घडली आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सुदान फार्मा या कंपनीची तळंदगे गावानजीक बांधकाम सुरू आहे. यासाठी पाणी साठवण करून ठेवण्यासाठी मोठा खड्डा खणण्यात आला आहे. तसेच यामध्ये पाणीही भरण्यात आले आहे. तर या कंपनीमध्ये अमोल अशोक मालवाणे (रा. यळगूड) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असून सहपरिवार येथेच कंपनी आवारातच वास्तव्यास आहेत.
बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा दीड वर्षाचा मुलगा विराज अमोल मालवाणे हा खेळत खेळत घराबाहेर आला. तसेच घरानजीक पाणी साठवून ठेवण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडला. थोड्यावेळाने बाळ कुठेच दिसत नसल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी त्यानंतर सर्वत्र शोधाशोध करण्यास सुरुवात केली. यावेळी विराज खड्ड्यातील पाण्यात पडलेला त्यांना आढळून आला. त्याला तत्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली असून पुढील तपासासाठी ही घटना गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. अवघ्या दीड वर्षाच्या विराज चा झालेला मृत्यू हा सर्वांना चटका देऊन जाणारा ठरला आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पालकांच्या बेपर्वाईमुळे अशा प्रकारे एखाद्या बाळाचा जीव जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येही बांधकामावर काम करणाऱ्या आईने पार्किंगमध्ये बाळाला झोपवले होते. त्यावेळी गाडी अंगावर गेल्याने त्या बाळाचा मृ्त्यू झाला होता.