कोल्हापूर- गेल्या वर्षीच्या महाप्रलयाचा सर्वाधिक फटका बसलेल्या आंबेवाडी आणि चिखली गावकऱ्यांनी आता स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. जवळपास अर्ध्याहून अधिक गाव आता मोकळे झाले आहे. अजूनही काही नागरिक आपली जनावरे आणि एक महिना पुरेल असे धान्य, जीवनावश्यक साहित्य घेऊन सोनतळी तसेच आपापल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोणत्याही क्षणी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. सध्याची पाणीपातळी 42 फुटांहून अधिक असून 43 फुटांवर धोका पातळी आहे. आता धोकापातळी साठी केवळ 1 फूट बाकी आहे. सुरक्षेच्या कारणात्सव जिल्ह्यातील नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गेल्या वर्षी सर्वाधिक फटका बसलेल्या चिखली आणि आंबेवाडी गावातील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण सध्या आपल्या जनावरांना बाहेर काढत आहेत.
दरम्यान, राधानगरी धरण सुद्धा कोणत्याही क्षणी 100 टक्के भरणार असून स्वयंचलित दरवाजे सुद्धा उघडण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात एनडीआरएफची 2 पथके तैनात करण्यात आली असून आणखी 2 पथके आज कोल्हापुरात दाखल होणार आहेत. शिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुद्धा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जीवन ज्योतचे जवान तैनात केले आहेत.