कोल्हापूर - भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट हा निव्वळ योगायोग नाही, तर शंकास्पद आहे. असे वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात केले. काल महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल. याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, मुश्रीफ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.
भाजपचे नेते राज्यपालांनाच अडचणीत आणतील-
मुश्रीफ म्हणाले, महाविकास आघाडीकडून 12 जणांची यादी राज्यपालांकडे देण्यात आली. त्यानंतर लगेच चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची भेट घेतली. हा केवळ योगायोग नाही तर शंका घेण्यासारखं आहे. खरंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पाटील हे दोघेही आज राज्यपालांकडे गेले असते. पण फडणवीस हे क्वारंटाईन असल्याने कदाचित पाटील हे एकटेच गेले असावेत. या सगळ्या भेटीगाठीमुळे भाजपचे नेते राज्यपाल यांनाच अडचणीत आणतील.
हे आमचं दुर्दैव -
एकदा कॅबिनेटमध्ये ठरलेल्या नावाची यादी जेंव्हा मुख्यमंत्री राज्यपाल यांच्याकडे पाठवतात. तेंव्हा शक्यतो कधीच विरोध होत नाही. देशातील कोणत्याच राज्यात असे कधी घडले नाही. मात्र महाराष्ट्रात हा प्रयोग सातत्याने होत आहे. हे आमचं दुर्दैव असल्याचेही मुश्रीफ यांनी म्हटले.
मराठी मुलीचे कुंकू पुसले म्हणून अर्णबला अटक -
यावेळी अर्णब गोस्वामी यांची समर्थनार्थ भाजपने घेतलेल्या भूमिकेबाबत मुश्रीफ यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'अर्णब गोस्वामी यांना पत्रकार म्हणून अटक केली नाही. तर एका मराठी मुलीचे कुंकू पुसले गेले. तिच्या पतीच्या आत्महत्येला जबाबदार धरत त्यांना अटक करण्यात आली आहे.'
यावर भाजपने आंदोलने केले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी हे प्रकरण 10 वर्षांपूर्वीचे असल्याचे वक्तव्य केले. त्यांनी केलेले वक्तव्य ऐकून मी थक्क झालो. खरतर त्यांना आपण काय बोलतोय याचे भान राहिले नाही. अशी टीका देखील मुश्रीफ यांनी पाटील यांच्यावर केली.
हेही वाचा- सुरक्षिततेची खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हेही वाचा- राज्याच्या 'या' कॅबिनेट मंत्र्याच्या वहिनीची गळफास घेत आत्महत्या; माहेरच्यांनी केले गंभीर आरोप