कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Farmers Association) जाहीर केलेले उद्या शुक्रवारचे चक्काजाम आंदोलन 7 दिवस स्थगित करण्यात आले आहे. स्वतः राजू शेट्टी (Raju shetti) यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या आयोजित बैठकीत योग्य तोडगा न निघाल्यास 3 डिसेंबरला जोरदार संघर्षाला तयार राहा असे आवाहन सुद्धा शेट्टी यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपी (FRP) देण्यासंदर्भात ठाम आहे. त्यामुळे या चक्काजाम आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
काय आहे नेमकी मागणी ? मागील सरकारने उसाच्या एकरकमी एफआरपी अदा करण्यासंदर्भात फेब्रुवारी 2022 रोजी शासन निर्णयाद्वारे एफआरपी अदा करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. यासाठी साखर आयुक्तांकडे तसेच राज्यभर ऊसतोड बंद आंदोलन केले होते. याचाच पुढचा भाग म्हणून उद्या शुक्रवारी 25 नोव्हेंबर रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलन घोषित करण्यात आले होते.
मात्र, आंदोलनापूर्वीच सरकारकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना चर्चेबाबतचे आमंत्रण आले आहे. येत्या 29 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये मागणीबाबत ठोस निर्णय न झाल्यास आपण चक्काजाम आंदोलनावर ठाम असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. 3 डिसेंबर पर्यंत सरकारला अवधी देण्यात येणार असून चर्चेमध्ये निर्णय झाल्यास आंदोलनावर आपण ठाम असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.