कोल्हापूर - सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज अटक केली. बबलू वडार, सचिन हिंगणे आणि सुनील रणखांबे अशी या अटक केलेल्या ३ आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६०० ग्रॅम वजनाचे दागिने आणि २ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोनसाखळी चोरणाऱ्या ३ आरोपींपैकी २ आरोपी हे उच्च शिक्षित असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हे ३ चोर कोल्हापूर आणि इतर ठिकाणी रस्त्यावरुन चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून चोरी करुन पळून जाणे आणि घरफोड्या करणे अशा प्रकारचे गुन्हे करत होते. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यामधील मुख्य आरोपीची निकेश उर्फ बबलू वडार याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने काही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या सोबत आणखी २ साथीदार सचिन हिंगणे आणि सुनील रणखांबे असल्याची माहिती दिली.
पोलीस तपासात या आरोपींनी २५ सोनसाखळी चोरल्याचे तर २ घरफोड्यांचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. अटक केलेल्या ३ आरोपींकडून तब्बल १८ लाख १९ हजार रुपये इतक्या किंमतीचे दागिने सापडले आहेत. चोरी केलेले सोने पोलिसांनी ताब्यात घेतले असून यामध्ये ६०० ग्रॅम वजनाचे दागिने आढळून आले आहेत. ज्या लोकांचे दागिने चोरीला गेले आहेत, त्यांची कोल्हापूर पोलिसांतर्फे यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी चोरीची तक्रार केली आहे त्यांना ते दागिने परत मिळवण्यासाठी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.