कोल्हापूर - सीएए, एनआरसी प्रकरणावरून देशात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बांगलादेशी नागरिकांना हकालण्याची भाषा करणारी शिवसेना आता शांत आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची गुलाम झाली आहे का? गुलाम झाली असेल तर मी त्यांना सलाम करतो, असा टोला आठवले यांनी सेनेला लगावला आहे. ते कोल्हापुरात आले होते त्यावेळी बोलत होते.
सीएए प्रकरणी जमिया मिलिया विद्यापीठावरील पोलिसांची कारवाई सूडबुद्धीने झाली नाही. शिवाय एनआरसी कायदा आसाम पुरता मर्यादित आहे. या कायद्यामुळे मुस्लीम, हिंदू, आदिवासी नागरिकांसह मुळ भारतीयांना त्रास होणार नसल्याचे मतही यावेळी मंत्री आठवले यांनी कोल्हापुरात व्यक्त केले आहे.
देशामध्ये जेंव्हा तिहेरी तलाक आणि राम मंदिर या सारख्या बहुचर्चित प्रकरणाचे निकाल ज्यावेळी लागले, तेंव्हा मुस्लीम समुदाय शांत राहिला. त्यांनी कोणत्याही पद्धतीने या निर्णयाला विरोध केला नाही. पण काहींकडून मुस्लिमांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आठवले यांनी केला. मात्र, मुस्लीम समाजान शांत राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांनी मागासवर्गीय सर्वच शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, अशी मागणी करत 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करून बाकिच्या शेतकऱ्यांची डोकी भडकवू नका, असेही म्हंटले आहे. कर्जमाफीच्या या मागणीसाठी रिपाईं येत्या 10 जानेवारीला राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी आठवले यांनी दिली.