कोल्हापूर : विरोधी सभासदांचा ऊस राजाराम साखर कारखान्यावर न नेल्याच्या आरोपावरून कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना संतप्त शेतकऱ्यांनी बेदम मारहाण केलीय. या मारहाणीत चिटणीस गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक हात मोडला आहे. तसंच त्यांच्या बरगड्या तुटल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक दशकांच्या इतिहासात पहिल्यांदाच कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला मारहाण झाली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांत 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पुन्हा एकदा पाटील विरुद्ध महाडिक वाद उफाळून आला आहे.
कारखान्याच्या संचालकांना बेदम मारहाण : छत्रपती राजाराम साखर कारखाना विरोधकांचे ऊस वेळेवर नेत नसल्याच्या कारणांवरून भाजपाचे माजी आमदार अमल महाडिक तसंच काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गट आमनेसामने आले आहेत. यातूनच मंगळवारी सायंकाळी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिसात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
आठ जण पोलिसांच्या ताब्यात : यावेळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांनी शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार कसबा बावड्यातील माजी स्थायीसमिती सभापती डॉ. संदीप नेजदार यांच्यासह आठ ते दहा जणांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यासह लाखांचा ऐवज चोरीला गेलाय, असं त्यांनी म्हटलंय. चिटणीस यांच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. चिटणीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संदीप नेजदारसह आठ जणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आमदार सतेज पाटलांवर गुन्हा दाखल करा : राजाराम कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांना असं कृत्य करण्यास प्रवृत्त करणारे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. या हल्ल्यातील मुख्य संशयित संदीप नेजदार यांनी आमदार सतेज पाटील यांच्या सांगण्यावरून हा प्रकार घडवून आणल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. संशयित आरोपींचे कॉल रेकॉर्ड तपासून आमदार सतेज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही खासदार महाडिक यांनी केली.
हेही वाचा -