कोल्हापूर - मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने राज्यात मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मंगळवारी काही निर्णय घेतले. त्या निर्णयाचे मी स्वागत करतो, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले. तर सुप्रीम कोर्टात स्थगिती उठवण्याबाबत विनंती करावी, असे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर, समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही विविध मागण्या केल्या होत्या. मूळ आरक्षण मिळेपर्यंत 10 टक्के आरक्षण सुरू करा, असा आग्रह आम्ही राज्य सरकारकडे धरला होता. त्यानुसार मंगळवारी राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. केवळ विरोधक म्हणून नाहीतर चांगल्यासाठी दोघेही यापुढे आरक्षणासाठी काळजीपूर्वक आणि नीट लढू, असं मत पाटील यांनी व्यक्त केले.
आता राज्य शासनाने स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावे. हे प्रकरण खंडपीठाकडे पाठवून ही मागणी नीट मांडली पाहिजे. राज्य शासनाने केवळ काल घेतलेले निर्णय करून चालणार नाही तर अंमलबजावणी करून काटेकोरपणे पालन केले पाहिजे. विरोधक असलो तरी न्यायालयीन लढाईत आम्ही सत्ताधाऱ्यासोबत आहोत. राज्य सरकारने मुख्य न्यायाधिशांना विनंती केली पाहिजे, जसे इतर आरक्षण देताना निकाल खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले, तसे मराठा आरक्षणाला देखील स्थगिती न देता खंडपीठात वर्ग करावे. त्यावरील स्थगिती उठवण्याबाबत विनंती करावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.