कोल्हापूर - प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले होते. मात्र, त्याला एक वर्ष उलटत आले तरी याची रक्कम शेतकऱ्यांना मिळलेली नाही. हे अनुदान तातडीने जमा करावे, अन्यथा कोल्हापुरातून मोठे आंदोलन उभे करून शेतकऱ्यांपुढे राज्य सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला. ते कागल तालुक्यातील कसबा-सांगाव येथे शिवार संवाद यात्रेत बोलत होते.
नियमित कर्ज भरणे हा गुन्हा झाला का?
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यामध्ये सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत असलेली दोन लाख रुपयांपर्यंतची कर्ज रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे नियमित कर्ज भरणे हा गुन्हा झाला का? अशी भावना या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. म्हणून प्रामाणिक शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदत सरकारने जाहीर करावी. प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शासनाने जाहीर केलेले हे अनुदान तत्काळ संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज केली.
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय
या मागणीसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. राज्यात साधारणपने 44 लाख 70 हजार व जिल्ह्यात साधारणपणे 2 लाख 20 हजार शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरणारे आहेत, त्यांची रक्कम अंदाजे 25 हजार कोटी होते. मात्र, अद्याप याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही झालेली नाही. आता तर सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे वक्तव्यसुद्धा केले जात नाही. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार? अशी विचारणा शेतकऱ्यांकडून होत आहे. पुन्हा एकदा प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय शासनामार्फत होतो की काय? अशी भीती व्यक्त होत आहे . त्यामुळे शासनाने जाहीर केलेली ही अनुदानाची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या प्रश्नासाठी लवकरच मोठे आंदोलन उभे करणार असल्याची घोषणा आजच्या शिवार-संवाद यात्रेत घाटगे यांनी केली.