कोल्हापूर - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मूळ गावीदेखील भाजपचा दारुण पराभव झाला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर यांनी बाजी मारली आहे. एकूण 9 सदस्यांची ग्रामपंचायत असलेल्या खानापूरमध्ये शिवसेनाला 6, तर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला प्रत्येकी 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे चांद्रकांत पाटील यांच्या मूळ गावातच त्यांना मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, आमदार प्रकाश अबिटकर यांनी मतदारांचे आभार मानले असून शिवसेनेचा झेंडा ग्रामपंचायतीवर फडकतोय याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला विरोधात भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत -
एकीकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र, चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाला टक्कर द्यायला भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, स्थानिक आमदार शिवसेनेचे असल्याने शिवाय त्यांचा गावात मोठा गट असल्याने गावात शिवसेनेचा विजय झाला आहे.
खानापूरची एकूण पार्श्वभूमी -
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावाची जवळपास अडीच ते तीन हजार इतकी लोकसंख्या आहेत. एकूण 9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीच्या निडणुकीत प्रत्येकवेळी गावातील गटांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत असते. चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच गावात आमदार प्रकाश अबिटकर यांना मानणारा मोठा गट आहे. शिवाय पालकमंत्री सतेज पाटील, के. पी. पाटील यांना मानणारा सुद्धा मोठा गट आहे. या मतदारसंघात प्रकाश अबिटकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे खानापूर गावातील शिवसेनेच्या गटाने सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र, सेनेला टक्कर देण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस हे तीन पक्ष एकत्र आले होते. त्यामुळे या गावातील निवडणुक अधिकच रंगत आली होती. तरीही शिवसेनेने ही बाजी मारली आहे.
हेही वाचा - मुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत सोमवारनंतर बैठक घेऊन निर्णय घेऊ - महापौर