कोल्हापूर - चहा आणि कॉफी पिल्यानंतर अनेक ठिकाणी सध्या प्लास्टिक व कागदी कप फेकलेले पाहायला मिळतात. म्हणूनच होणारा हा कचरा टाळण्यासाठी नवीन पर्याय शोधण्यात आला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक किंवा कागदी कप ऐवजी 'बिस्कीट कप' हा नवीन पर्याय समोर आला आहे. कोल्हापूर शहरातील तीन तरुणांनी मिळून हा पर्याय शोधला असून या कपचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुद्धा घेत आहेत. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शेखर पाटील यांचा हा विशेष रिपोर्ट...
स्वतःचा बनवला ब्रँड -
खरतर प्लास्टिकला पर्याय म्हणून कागदी कप बाजारात आले. मात्र, त्याचे सुद्धा काही दुष्परिणाम असल्याचे समोर आले. म्हणूनच कोल्हापुरातील दिग्विजय गायकवाड, आदेश कारंडे आणि राजेश खामकर या तिघा तरुणांनी बिस्किट कप तयार केले आहेत. त्यांनी आपल्या ब्रँडला 'मॅग्नेट एडीबल कटलरी' असे नाव दिले आहे. चहा किंवा द्रव पेय पिल्यानंतर पिठापासून बनवलेले हे कप खाता येतात. शहरातील प्रत्येक चहाच्या गाडीवर बिस्किट कप पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.
फेकलेले कप जनावरे सुद्धा खाऊ शकतात -
हे कप 'झिरो वेस्ट' तत्वावर बनवण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीला चहा पिल्यानंतर हे कप खायचे नसतील किंवा जर हे कप चुकून रस्त्यावर फेकले तर भटकी जनावरे सुद्धा हे कप खाऊ शकतात. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतेच शिवाय मोठ्या प्रमाणात चहाच्या कपची विल्हेवाट लावण्याची समस्या सुद्धा सुटेल.
सध्या 50 टक्के व्यवसाय तोट्यात -
हा व्यवसाय नवीनच असल्याने सध्या त्यांना 50 टक्के तोटा सहन करावा लागत आहे. अनेक दुकानदारांना सुरुवातीला मोफत कप दिले आहेत. काही ठिकाणांहून त्यांना ऑर्डर यायला सुरुवात झाली आहे. इतर राज्यात काही ठिकाणी सध्या या कपची किंमत 7 ते 8 रुपयांपर्यंत आहे. मात्र, कोल्हापुरातील या तरुणांनी बिस्कीट कपची किंमत केवळ 3 रुपये इतकी ठेवली आहे. शिवाय लवकरच खाण्यायोग्य प्लेट आणि बाऊलसुद्धा बनवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
पालकमंत्र्यांसह मतदारसंघातील आमदारांनी केले कौतुक -
या तिघांच्या नवीन प्रयोगाची दखल घेत स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील तसेच कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
अनेकांनी 'बिस्किट कप'चे केले स्वागत -
सध्या हे तिघेही तरुण कोल्हापूर शहरातील विविध स्टॉलवर जाऊन बिस्किट कपबद्दल माहिती देत आहेत. तीनशे ते चारशे स्टॉलला आजपर्यंत त्यांनी भेट दिली आहे. यामध्ये क्वचितच लोकांनी त्यांच्या या कपला ऑर्डर दिली आहे. मात्र, तरीही धीर न सोडता बिस्किट कप हेच भविष्य असून लोकांनासुद्धा नंतर याची सवय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही ठिकाणी या कपद्वारे चहा देण्यास सुरुवात झाली आहे. ग्राहकांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला असून प्रदूषण टाळण्यासाठी हा उत्तम पर्याय असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या आहेत.