कोल्हापूर - भीती बाळगू नये, परंतु स्वत:सह इतरांची काळजी घ्या. त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा, असा संदेश पन्हाळा तालुक्यातील वाघबीळ येथील एकलव्य कोरोना काळजी केंद्रामधून अडीच महिन्याच्या आपल्या बालकासह आज कोरोनामुक्त झालेल्या आई-वडिलांनी दिला. शिवाय या केंद्रातून आज आणखी 9 जण कोरोनामुक्त झाले. त्या सर्वांचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले.
पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील 35 वर्षीय व्यक्ती गुजरात येथील सुरत येथे कामानिमित्त गेले होते. तेथेच त्यांच्या मुलाचा जन्म झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 16 जुलै रोजी ते सुरतहून आपली 27 वर्षीय पत्नी आणि 70 वर्षांच्या सासूसह जिल्ह्यामध्ये आले. किणी तपासणी नाक्यावरून त्यांना पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील एकलव्य कोविड काळजी केंद्रात पाठवण्यात आले. 17 जुलै रोजी या चौघांचा स्वॅब घेण्यात आला. 18 जुलै रोजी त्यांचा पॉझिटिव्ह अहवाल आला. तेंव्हापासून या चौघांना या केंद्रामध्ये ठेवण्यात आले होते.
आई म्हणून सुरुवातीला बाळाची खूप काळजी वाटत होती. थोडी भीतीही वाटत होती. परंतु, नंतर पतीने धीर दिला आणि हळूहळू भीती नाहीशी झाली, अशी प्रतिक्रिया बाळाच्या आईने दिली. तर कोणीही कोरोनाची भीती बाळगू नका, पण काळजी मात्र घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया बाळाच्या वडिलांनी दिली.
दरम्यान, नियमानुसार केंद्रातील बाधितांवर उपचार करण्यात आले. या केंद्रातून आज एकूण 9 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज कार्ड देवून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जावेद कच्छी, डॉ. स्वानंद मिरजकर, डॉ. अरविंद शिनोळकर, डॉ. सुप्रिया ढोले, पर्यवेक्षक गोपाळ पाटील, परिचारिका रुपाली पाटील, अरुणा मांगले आदींचे पथक या केंद्रातील बाधितांवर उपचार करत आहे.