कोल्हापूर - गेल्या काही दिवसांपासून बाळुमामाच्या नावावर मनोहर भोसले नावाचा एक ढोंगी बाबा अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहे. अशा ढोंगी बाबापासून सर्वांनी सावध राहावे शिवाय या ढोंगीबाबा वर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अशी मागणी बाळूमामा देवस्थान, आदमापूर यांच्यावतीने करण्यात आली. बाळूमामाच्या भक्तांची संख्या जसजशी वाढत आहे, तसतसे भोंदुबाबा निर्माण होत आहेत. त्यांच्यापासून सर्वांनी सावध राहून त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही यावेळी आदमापूरचे सरपंच विजय गुरव यांनी केले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
ढोंगी बाबा मनोहर भोसले अन् बाळूमामा देवस्थानचा काहीही संबंध नाही
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र आदमापूर येथील श्री संत बाळूमामा यांच्या नावाने मनोहर भोसले नावाचा एक ढोंगी बाबा अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहे. मनोहर भोसले हा उदगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील असून बाळूमामाच्या बद्दल तो भक्तांना जे काही सांगत आहेत ते सर्व काही खोटं आहे. त्याचा आणि बाळूमामाच्या देवालयाचा काहीही संबंध नाही. जो बाळूमामाचा भक्त असतो तो भक्तांना अशा पद्धतीने कधीच फसवणार नाही, असेही यावेळी आदमापूर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हटले.
असा कोणी भोंदू बाबा असेल तर त्याची तात्काळ पोलिसांना माहिती द्या
गेल्या अनेक वर्षांपासून श्री क्षेत्र बाळूमामाच्या भक्तांची संख्या वाढतच चालली आहे. भक्तांची संख्या वाढत चालली असल्यामुळे अनेक भोंदू बाबा निर्माण होत आहेत. शिवाय आपल्याकडे वेगळी शक्ती असल्याचे भासवत सर्व काही खोटे सांगत आहेत. बाळूमामाचा अवतार किंवा वंशज कोणीही नाही. जर कोण असे भासवत असेल तर ते साफ चुकीचे आहे. अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर आपण जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती द्यावी. शिवाय या ढोंगी बाबांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी, अशीही मागणी बाळुमामा देवस्थान आदमापूर यांच्याकडून करण्यात आली. या पत्रकार परिषदेत बाळूमामा देवालय आदमापूरचे विश्वस्त गोविंद पाटील, शिवाजी मोरे, लक्ष्मण घोडके, सरपंच विजय गुरव, पोलीस पाटील व व्यवस्थापक अशोक पाटील आणि आदमापूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.
हे ही वाचा - 'त्याच्या' संपत्तीची चौकशी करा, अन्यथा राज्यभर आंदोलन; बाळूमामांच्या भक्तांचा इशारा