कोल्हापूर : सोलापूर येथे पार पडलेल्या अधिवेशनाला मोठ मोठे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह स्थानिक आमदार आणि नेते उपस्थित होते. या महाअधिवेशनामध्ये गुरव समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. या घोषणेचे गुरव समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले असून, येत्या शनिवारी कोल्हापूरमध्ये विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने राज्यभरातील गुरव समाज उपस्थित असणार असल्याची माहिती गुरव समाजाचे कार्याध्यक्ष सहदेव गुरव यांनी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
50 कोटींच्या मदतीची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा : गुरव समाजासाठी संत काशिबा महाराज महामंडळ सुरू करण्यात येईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी ११ डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या महाअधिवेशनामध्ये केली होती. त्याचबरोबर महामंडळाला प्राथमिक टप्प्यात 50 कोटी रुपयांचा निधीसुद्धा देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. या गोष्टीमुळे गुरव समाजाच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश मिळाले आहे. या निर्णयाबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आणि गुरव समाजातील अनेक सदस्य नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीत निवडणुकीत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यपदी निवडून आले आहेत. त्यांचा सत्कार करण्यासाठी या भव्य अशा मेळाव्याचे कोल्हापुरात आयोजन करण्यात आले. येत्या शनिवारी म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये हा मेळावा पार पडणार आहे. गुरव समाजाचे अध्यक्ष धनाजी गुरव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
वधु-वर मेळाव्याचेही आयोजन : 11 फेब्रुवारीला होणाऱ्या विजय मेळाव्यात गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार विजयराजे शिंदे यांचा विशेष सत्कार ही होणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचाही विशेष गौरव केला जाणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती आर.डी. पाटील, एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मंत्रालयातील उपसचिव गजानन गुरव, महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अनिल कोकीळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्यासह विविध मान्यवरांची या मेळाव्याला उपस्थिती असणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कारानंतर राज्यव्यापी वधू-वर मेळावा ही होणार असल्याची माहिती धनाजी गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष डॉ. सुरेश गुरव, सहदेव गुरव, जगदीश गुरव, बाळकृष्ण गुरव, सुभाष गुरव, किरण गुरव, जालंधर गुरव आदी उपस्थित होते.