कोल्हापूर - डॉ. अनिल बोंडे यांनी पोलिसांबाबत केलेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. ते याआधी विधानसभेचे आमदार, मंत्री राहिले आहेत. पोलिसांना कुत्रे बोलणे अतिशय चुकीचं आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य तपासून गृहमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर भाजप नेते डॉ. अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना कुत्रे बोलल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांच्यावर कारवाईची करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्याने राज्यभरातील विद्यार्थी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, यावेळ माजी मंत्री अनिल बोंडे आणि पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. बोंडे यांनी पोलिसांना सरकारचे कुत्रे म्हणत हिणवलं, याउलट पोलिसांनी सुद्धा तुम्ही कुत्रे आहात असे प्रत्युत्तर दिले. सध्या पोलीस आणि डॉ. अनिल बोंडे यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. अनिल बोंडे यांनी सुद्धा हा व्हिडीओ ट्विट केला आहे.