कोल्हापूर: देशाचे गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालावरून मंत्री शाह यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला जात आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये भाजप आणि शिवसेन्या महायुतीत प्रचार केला पण मतदानाचा निकाल आल्यावर ते सर्व विचारसरणी विसरून मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या पाया पडले, अशी टीका गृहमंत्री शाह केली.
भाजप-शिवसेना एकत्र निवडणुका लढवतील: आगामी काळात सर्व निवडणुका भाजप शिवसेना एकत्र लढणार असून दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीसह उरलेसुरले सर्व पक्ष आमच्या विरोधात असणार आहेत. मात्र ही निवडणूक नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी नसून भारताला महान आणि समृद्ध भारत करण्यासाठी असेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत. कोल्हापुरात आज भाजपची विजय संकल्प सभा पार पडली. या सभेला गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, यांची उपस्थिती होती.
भाजपचाच विजय होणार: अमित शहा पुढे म्हणाले की, मी जेव्हा जेव्हा कोल्हापुरात आलो तेव्हा श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले आणि अंबाबाईचे दर्शन घेतले की भाजप विजय झाला आहे. यामुळे आज मी अंबाबाईचे दर्शन घेतले तर आगामी काळात सर्व निवडणुका या भाजप-शिवसेना एकत्र निवडणुका लढवतील. उरले सुरले मात्र एकत्र येऊन भाजपविरोधात लढतील. काही झाले तरीही २०२४ मध्ये भाजपचाच विजय नक्की होणार आहे. कारण एकदा एके ठिकाणी भाजप निवडून आली तर तेथे पुन्हा भाजपच निवडून येते. त्यामुळे मला आगामी निवडणुकांची चिंता नाही. भाजपला सत्तेचा लोभ नाही आणि आम्ही आमची विचारधारा कधीच विसरणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.
काँग्रेस सरकारवर टीका: अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसमध्ये दहशतवादाविरोधात लढण्याची हिंमत नव्हती. काँग्रेस सरकारमध्ये पंतप्रधानांना कोणीही विचारत नव्हते. सगळेच मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होते. त्यांच्या काळात अराजकता माजलेली होती. देशाची आर्थिक सुव्यवस्था, काश्मीरमधील प्रश्न गंभीर होती अशी टीका केली असून गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आम्ही उद्धव ठाकरेंना मदत केली, तरी देखील त्यांनी निकाल आल्यानंतर पलटी घेतली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
धनुष्यबाण काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवले: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी निवडणुका भाजपसोबत लढल्या मात्र निकालानंतर खुर्चीच्या हवासापोटी 25 वर्षाची युती तोडली आणि दुष्मनांसोबत गेले. मात्र ते ज्यांच्यासोबत गेले त्यांनीच आता त्यांना संपूर्ण उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर आणले. शिवसेना हे विचार आहेत ते कोणाचीही प्रॉपर्टी नाही. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे धनुष्यबाण गहाण ठेवले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत एकत्र येत धनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादी मधून सोडवून आणले. कोल्हापुरात काँग्रेसला बाजूला करण्यासाठी आगामी काळात सर्व निवडणुका या भाजप शिवसेना एकत्रित लढवणार असून कोल्हापुरात भगवा फडकवणारच, असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.