कोल्हापूर Ajit Pawar Kolhapur Sabha : भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी आमच्यावर दबाव होता, पण जनतेची कामे करायची होती, गेल्या अडीच वर्षांत जनतेची कामे हाती घेतली होती, ती पूर्ण करायची होती. रखडलेल्या कामांवरील स्थगिती उठवण्याचा दबाव होता. निधी देण्यासाठी आमदारांवर दबाव होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्याच्या कामाचा ताण पडत होता, मात्र आमची बदनामी करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. ते आज कोल्हापुरातील तपोवन मैदानावर आयोजित केलेल्या उत्तरदायित्व सभेत बोलत होते.
स्वार्थासाठी सत्तेत गेलो नाही : मी कोणाच्या दबावाला भीक घालत नाही. आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे. भाषण करून काम होत नाही. त्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते. राज्याची कायदा, सुव्यवस्था चांगली रहावी. कोठेही जातीय सलोखा बिघडू नये. त्यासाठी आम्ही वाहून घेतलं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत गेला नाही, ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीतून देशाला सामाजिक समतेचा संदेश मिळाला आहे. त्यामुळं सत्तेचा वापर शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा वारसा जपण्यासाठीच करत असल्याचं पवार यावेळी म्हणाले.
तर राजकारणातून निवृत्त...महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी एखादा दुसरा सोडला, तर महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यासाठी आमच्या सर्व आमदारांनी निर्णय घेतला होता. तसं 52 आमदारांच्या सहीच पत्र दिलं होतं. हे जर खोटं असेल तर राजकारणातून निवृत्त असा दावा देखील त्यांनी केलाय. उत्तरदायित्व सभेनिमित्त आज सायंकाळी तपोवन मैदानावर झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते. ईडीच्या कारवाईला घाबरून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्याच्या टीकेची खदखद देखील त्यांनी यावेळी बोलून दाखविली.
कडक बंदोबस्त : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाहीफेक, बाटली फेक असे प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रचंड दक्षता घेण्यात आल्याचं दिसून आलं. सभेत पाण्याची बाटली घेऊन जाण्यास कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी रोखलं होतं.
हेही वाचा -