कोल्हापूर - एशियन पेंटने आपल्या एका जाहिरातीमध्ये कोल्हापूरचा उल्लेख घेतला आहे. जाहिरातीतील कोल्हापूरचा उल्लेख हा कोल्हापूरला हीन दाखवण्यासाठी केला असल्याचा आरोप जिल्हावासियांनी केला आहे. जाहिरातीविरोधात कोल्हापूरकरांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. शहरातील विविध ठिकाणी आज एशियन पेंटच्या जाहिराती विरोधात निदर्शने करण्यात आली. जोपर्यंत माफी मागितली जात नाही तोपर्यंत कोल्हापुरात कंपनीचा एकही ट्रक येऊ देणार नाही, असा पवित्रा विविध पक्षांनी घेतला आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी काल एशियन पेंटच्या 'त्या' जाहिरातीविरोधात ट्विट करत कंपनीने कोल्हापूरवासीयांची माफी मागावी, अशी मागणी केली होती. एशियन पेंट विरोधात विविध ठिकाणी निदर्शन सुरू करण्यात आली आहेत. कंपनीची गाडी कोल्हापुरात आली तर फोडून टाकू, असा इशारा कोल्हापुरातील मनसे कार्यकर्त्यांसह शहरातील कसबा बावडा परिसरातील युवकांनी दिला आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीच्या पोस्टारला काळे फासत घोषणाबाजी केली तर, कसबा बावडा येथील युवकांनी 'एशियन पेंट' कंपनीच्या रंगांच्या बादल्या रस्त्यावर ओतून 'त्या' जाहिरातीचा निषेध केला. यावेळी मनसेच्या प्रसाद पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कसबा बावडा येथील आंदोलनात निरंजन पाटील, रणजित पाटील, निलेश ठाणेकर, उत्तम पाटील, तुषार पाटील, पंकज पाटील, रोहित गायकवाड, तेजस पाटील आदी उपस्थित होते.