कोल्हापूर Action On UBT Leader : दोन दिवसापूर्वी 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'चे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' या उद्धव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये हातकणंगले लोकसभा मतदार संघावरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. तर या भेटीवरुन उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवत राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती. मात्र आता त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी भेटीवर नाराजी : महाविकास आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदार संघ 2019 च्या निवडणुकीत या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झाले होते. मात्र पक्षात झालेल्या वादानंतर धैर्यशील माने हे शिंदे गटासोबत गेले होते. यामुळे या जागेवर महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार द्यायचा, याची चाचपणी सध्या सुरू होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी राजू शेट्टी यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. मात्र या भेटीवरुन जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी नाराजी दर्शवत राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. "राजू शेट्टी यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. याआधी आम्ही बाहेरच्या लोकांना पाठिंबा दिला, मात्र याचा पक्षाला काहीही फायदा झाला नाही. यामुळं येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्यावी" अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती.
जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी : मात्र मुरलीधर जाधव यांनी माध्यमातून दर्शवलेल्या या नाराजीवरून पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली असून त्यांच्या जागी वैभव उगले आणि संजय चौगुले यांना नवीन जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. यामुळं मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मुरलीधर जाधव हे गेल्या 19 वर्षांपासून हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत आहेत. मात्र त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळं हातकणंगले लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेना कोट्यामधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळणार, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
हेही वाचा :