कोल्हापूर - पर्यावरण आणि श्रद्धा हे जरी वेगवेगळे विषय असले तरी या दोन्हींची सांगड कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका गावात पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील शिरसंगी या गावामध्ये तब्बल दीड एकर क्षेत्रात एक वडाचे झाड विस्तारले आहे. या झाडाचे रक्षण गोठणदेव करतोय. ग्रामस्थांची मोठी श्रद्धा या देवावर आहे. ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्ट मधून पाहूया काय आहे, या वडाच्या झाडाचे महत्त्व..
हेही वाचा - श्रद्धा की अंधश्रद्धा ? परंपरेच्या नावावर स्वत:ला गायींच्या पायाखाली चिरडून घेतात लोक
झाडाखालच्या गोठणदेव नावाच्या दैवतावर लोकांची श्रद्धा
दरवर्षी या देवाची एक यात्राही पार पडते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडाखाली जाताना चप्पल घालून कुणीही जात नाही. त्याचबरोबर इथे फोडलेल्या नारळाचे खोबरेही कोणी घरी नेत नाही. रविवार आणि बुधवार हे या गोठणदेवाचे वार असतात. त्याचबरोबर शिरसंगी गावातील तरुण, नागरिक परगावी किंवा पुण्या-मुंबईला आहेत, त्यांचीही येथील देवतेवर मोठी श्रद्धा आहे. लोक जिथे कुठे असतील तिथूनच या देवाकडे मागणी करतात आणि त्यांची मागणी गोठणदेव पूर्ण करतो, अशी श्रद्धा त्यांच्या मनात आहे.
गोठणदेवाच्या यात्रेत किंवा इतर वेळी कुणीही मद्यपान करून इथे आले किंवा येथील झाडांवर कुऱ्हाड जरी चालवायचा कोणी प्रयत्न केला, तर त्यांना गोठणगाव शिक्षा करतो, अशीही एक श्रद्धा या परिसरातल्या भाविकांमध्ये आहे.
दर्शनासाठी महिलांना यायला बंदी
या देवाच्या दर्शनाला महिलांनी येऊ नये, असाही एक समज लोकांमध्ये रूढ आहे. यामुळे या झाडाखालच्या देवाच्या दर्शनासाठी महिलांना इथे यायला बंदी आहे. येथे महिलांनी आल्यास त्यांच्या जीवनात काही बरी-वाईट घटना घडेल, असा येथील लोकांचा समज आहे. यामुळे भीतीपोटी येथे महिला स्वतःहूनच येत नाहीत. मात्र, जरी महिलांना येथे यायला बंदी असली तरी अनेक महिला बाहेरूनच देवाचे दर्शन घेतात. त्याचबरोबर गोठणदेव आमची मागणी पूर्ण करतो, त्यामुळे येथे येणाऱ्यांनी नियम पाळावेत, असेही शिरसंगी गावातील महिला सांगतात. शिवाय, वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा पाळली गेली पाहिजे, असेही येथील महिलांना वाटते. यामुळे जरी या गोठणदेवाच्या दर्शनासाठी महिलांना परवानगी नसली तरी त्याबद्दल महिलांमध्ये कुठलेही दुमत नाही.
खरे तर, इतक्या मोठ्या क्षेत्रात विस्तारलेले हे एकमेव झाड म्हणावे लागेल. पण पर्यावरणाच्या दृष्टीने या झाडाचा अभ्यास व्हावा, असेही या गावातल्या तरुणांना वाटते. त्याचबरोबर जागृत दैवत असल्याची येथील लोकांची श्रद्धा असल्याने इथे येतानाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, असेही येथील पूजकांना वाटते.
हेही वाचा - कोल्हापूर : महिलेच्या शापामुळे जिल्ह्यातील 'या' दोन गावात सोयरीक नाही
हे झाड मोठ्या पडद्यावरही झळकलंय
हा झाला पर्यावरण आणि श्रद्धेचा विषय.. पण हेच झाड मोठ्या पडद्यावरही झळकलंय बरं का. मराठीतले ज्येष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांच्या जोगवा कादंबरीवर आधारित जोगवा चित्रपट ज्यावेळी तयार करण्यात आला, त्यावेळी या चित्रपटात या झाडाचे शूटिंग करण्यात आले. डेरेदार वृक्ष म्हणून आपण फक्त अनेक वेळी ऐकत असतो. पण प्रत्यक्षात हा भला मोठा वृक्ष आपण पाहतोय, याचा आनंद नक्की तुम्हाला होईल. पर्यावरण वाचवा, झाडे वाचवा, अशा अनेक वेळा घोषणा दिल्या जातात. पण पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी शिरसंगी गावातील हे झाड नक्कीच प्रेरणादायी आहे. वर्षानुवर्षाचा इतिहास या झाडाने पाहिला आहे. अजूनही या झाडाची वाढ होतच आहे. त्यामुळे या गावातले हे अजब-गजब वडाचे झाड पाहायला नक्की या.
हेही वाचा - धक्कादायक..! मांत्रिकाच्या सांगण्यावरून विवाहितेला बेदम मारहाण करीत घरातून काढले