कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेत ( Kolhapur MNC) जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर ( Jansurajya Shakti Party Mayor ) करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार विनय कोरेंनी केला आहे. ( MLA Vinay Kore ) भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक असल्याची कबुलीही त्यांनी दिली. विधानपरिषद निवडणुकीपासून कोल्हापूर जिल्ह्यात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
असे राजकारण बंद झाले पाहिजे -
पत्रकार परिषदेत आमदार विनय कोरे म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेत जनसुराज्य शक्ती पक्षाचा महापौर असावा, यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35-35 लाख दिले. हे करताना चांगले वाटले. मात्र, नंतर भावनेच्या भरात माझ्याकडून झालेली ही सर्वात मोठी चूक होती याची जाणीव झाली असेही कोरे म्हणाले. सर्वसामान्य लोकांच्या मनात राजकारणा बद्दल तिरस्कार निर्माण होईल, असे राजकारण यापुढे बंद झाले पाहिजे. यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराला यश आले. लोकशाहीत निवडणुका झाल्या पाहिजेत. मात्र, त्यांचं पावित्र्यही जपले गेले पाहिजे. 'मतदारसंख्या असणाऱ्या निवडणुकीत आर्थिक उलाढाली मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे लोकशाहीचे पावित्र्य जपण्यासाठी बिनविरोध निवडणूक करणे गैर नाही. मर्यादित मतदारसंख्या असणाऱ्या काही वेगळ्या गोष्टी पुढे येतात, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - 5 हजारांपेक्षा अधिक लोकसंखेच्या गावांसाठी नगरोत्थान योजनेसारखी योजना राबविण्याचा मानस - हसन मुश्रीफ
बाजार समिती निवडणूकसुद्धा बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घ्यावा -
दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील वडगाव बाजार समितीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे , माजी खासदार राजू शेट्टी, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी एकत्र येत मोठे आव्हान निर्माण केले आहे. याबाबतच आयोजित पत्रकार परिषदेत विनय कोरे बोलत होते. यावेळी त्यांनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वच पक्षांनी पुढाकार घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.