कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेसाठी अर्जांची छाननी करून मुलाखतीसाठी 25 उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. 26 आणि 27 सप्टेंबरला या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती होणार आहेत. 'कुलगुरू शोध समिती' मुलाखतीमधून पाच जणांची नावे निश्चित करून कुलपती कार्यालयाला सादर करणार आहे. या पाच उमेदवारांचे कुलपती तथा राज्यपाल यांच्यापुढे सादरीकरण होईल. त्यानंतर कुलगुरूपदी एका उमेदवारची निवड केली जाईल आहे, अशी माहिती कुलगुरू शोध समितीचे नोडल अधिकारी आर. के. जैन यांनी दिली.
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाल 17 जूनला संपला आहे. त्यानंतर कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड प्रक्रियेसाठी इच्छुकांकडून 2 जुलैपर्यंत अर्ज मागवले होते. कुलपती कार्यालयाने विद्यापीठ कायद्यानुसार पहिल्या टप्प्यात त्रिसदस्यीय कुलगुरू शोध समिती नेमली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, दिल्ली अशा विविध शहरातील शिक्षण संस्था, नामांकित विद्यापीठातील 169 प्राध्यापकांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले आहेत. समितीकडून त्या अर्जांची छाननी करुन पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी 25 जणांची नावे निश्चित केली आहेत.
मुलाखतीसाठी निवडलेल्या यादीतील काही नावे -
कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी निवडलेल्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ, सांगलीतील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागातील डॉ. व्ही. जे. फुलारी यांच्या नावांचा समावेश आहे. पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखेचे प्रमुख डॉ. संजीव सोनवणे, मानव्यविद्या शाखेच्या प्रमुख डॉ. अंजली कुरणे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अविनाश कुंभार यांच्या नावाचा समावेश आहे. इस्लामपूरचे सुपुत्र आणि जळगाव विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहुलीकर यांचे नावही मुलाखतीच्या यादीत असल्याचे वृत्त आहे.
कुलसचिवांसह विद्यापीठातील अनेकजण कुलगुरूपदाच्या शर्यतीतून बाहेर -
शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱयांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केले होते. यामध्ये कुलसचिव विलास नांदवडेकर, नॅनो टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले, माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे, डॉ. पी. एस. कांबळे, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कराडे, कॉमर्स विभागाचे डॉ. अण्णासाहेब गुरव, रसायनशास्त्र विभागातील डॉ. एस. एस. चव्हाण, पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत, बायोकेमेस्ट्री विभागाच्या डॉ. ज्योती जाधव यांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केले होते. मात्र, मुलाखतीसाठी जाहीर झालेल्या 25 जणांची यादीत यांचा समावेश नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील अनेक उमेदवार कुलगुरू पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा आहे.