जालना - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाचा उपक्रम जालन्यातील तरुणांनी हाती घेतला आहे. अमृतेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या शिवकालीन बारवातून गाळ काढण्याचे काम हे तरुण स्वखर्चातून करीत आहेत. वाढत जाणारी भीषण पाणीटंचाई आणि त्यामुळे जनावरांनाही होणारा त्रास कमी व्हावा आणि मुबलक पाणी मिळावे, हा यामागचा हेतू असल्याचे या तरुणांनी सांगितले.
जुना जालना भागातील शनी मंदिर चौकात अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराच्या बाजुलाच शिवकालीन बारव आहे. मात्र याचा वापर होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी याला कचराकुंडी केले होते. गणेश विसर्जन, निर्माल्य, घरातील कचरा अशाप्रकारे, ही बारव भरत आली. मात्र, या परिसरातील तरुणांनी पुढाकार घेऊन या बारवतील गाळ काढण्याचे ठरवले आणि पाहता पाहता ३० ते ४० तरुण एकत्र आले. आतापर्यंत या तरुणांनी २५ ब्रास गाळ काढला आहे. सुमारे दीडशे फूट खोल ही बारव असून पाण्यापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत. आजही त्या पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत.
गाळ काढण्याचे काम सुरुवातीपासून स्वखर्चाने सुरू आहे. मात्र या बारवतील खोली आणि वाढत जाणारा गाळ पाहता आता कुठेतरी आर्थिक मदतीची गरज या तरुणांना भासत आहे. हा गाळ काढून तिथे असलेल्या जीवंत झऱ्याच्या माध्यमातून या परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येईल. मात्र, नागरिकांचा या गोष्टीवर अजून विश्वास नसल्यामुळे हे तरुण आता आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खरेतर सद्यस्थितीत या बारवत पाण्याचे जीवंत झरे दिसत आहेत. त्यामुळे मुबलक पाणी मिळू शकेल, अशी परिस्थिती आहे.
स्वयंस्फूर्तीने हे काम केले जात आहे. यामध्ये सागर डुकरे, अमोल पांडव, अंकुश पांडव, संतोष काळे, दिनेश पवार, विशाल गायकवाड, अक्षय शर्मा, दशरथ पांडव, यांच्यासह ४० मित्रमंडळीची ही टीम कार्यरत आहे.