जालना - देशात एक्सई व्हेरीयंटचा एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला ( XE Variant in India ) असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी दिली आहे. शनिवारी (दि. 9 एप्रिल) टोपे यांच्या हस्ते जालन्यात माता आणि बाल संगोपन नवीन इमारतीचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुंबईहुन गुजरातमध्ये गेलेल्या एकाचा नमुना जिनोमिक सिक्वेसिंगसाठी ( Genome Sequencing ) पाठवला असता या रुग्णामध्ये एक्सई व्हेरीयंट आढळून आला असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली. मात्र, हा व्हेरीयंट फारसा घातक नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले.
गुजरातमध्ये झाली लागण - मुंबईच्या सांताक्रुझ येथील 67 वर्षीय पुरुष रुग्ण आणि त्याची पत्नी विमानाे वडोदरा येथे गेले होते. ते अलकापुरी, वडोदरा येथील एका हॉटेलमध्ये थांबले. याच हॉटेलमध्ये त्यांची 6 मार्चला लंडनहून आलेल्या दोन ब्रिटिश नागरिकांशी भेट झाली. त्यांना 11 मार्च, 2022 रोजी ताप आला आणि 12 मार्च रोजी चाचणी केली, त्याच दिवशी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी एक खासगी टॅक्सी भाड्याने घेतली आणि 13 मार्चला पत्नीसह मुंबईला त्यांच्या राहत्या घरी परतले. 20 मार्चपर्यंत 7 दिवस ते घरीच एकटे राहिले. 11 मार्चनंतर त्यांना इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यांची पत्नी आणि मोलकरीण या दोघांच्याही उच्च जोखमीच्या संपर्कात कोणतीही लक्षणे नाहीत, त्यांची चाचणी निगेटिव्ह आहे. या व्यक्तीने कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांना हायपरटेन्शनचा आजार आहे. मात्र, या रुग्णाला आता कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
केंद्राने शनिवारी (दि. 9 एप्रिल) 5 राज्यांना पत्र पाठवले असून कोरोना संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मात्र, महाराष्ट्रात फारशी वाईट परिस्थिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 60 वर्षांवरील नागरीकांना बूस्टर डोस ( Booster Dose ) देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोविशील्डला 600 तर कोव्हॅक्सीनला 250 रुपये, असा लसीकरणाचा दर खासगी दवाखान्यात ठरवण्यात आला आहे. पण, 60 वर्षांवरील नागरीकांना डोन डोस दिल्यानंतर बूस्टर डोसमधील अंतर हे 90 दिवसांचे ठेवण्यात आल्याचेही टोपे म्हणाले. वय वर्षे 15 ते 59 वर्षे वयोगटातील नागरीकांना बूस्टर डोसची सध्या गरज नाही, असा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. ज्याला बूस्टर डोस घ्यायचा आहे त्यांनी खासगी दवाखान्यात जाऊन शासकीय दराप्रमाणे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन टोपे यांनी केले. खासगी दवाखान्यांनी कोरोना लस साठवणूकीबाबत काळजी घ्यावी. त्यांना लस एक्स्चेंज करुन मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
सखोल तपास व्हायला हवा - एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना शनिवारी ( दि. 9 एप्रिल ) 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यावर टोपे म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांनी आजपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. मात्र, त्यांच्या घरावर झालेला हल्ला निंदणीय आहे, अशा शब्दात मंत्री टोपे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या घरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध ( Rajesh Tope on Silver Oak Attack ) केला. या हल्ल्यामागे कुणाचा हात आहे का याचा सखोल तपास व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा - Leopard Fell In Well : जालन्यात विहिरीत पडला बिबट्या; वन विभागाने केले रेस्क्यू ऑपरेशन, पाहा Video