जालना - भोकरदन तालुक्यातील आव्हाना शिवारात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळला आहे. आव्हाना येथील रामदास बजेबा गावंडे यांच्या घारेवाडीतल्या कपाशी पिकामध्ये गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान, मृतदेहाची प्रथमदर्शनी पाहणी केली असता, घातपात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आव्हाना येथील रामदास बजेबा गावंडे यांच्या घारेवाडी शिवारात ते कुटुंबासोबत शेतामध्ये काम करत होते. त्यावेळी कपाशीच्या शेतामध्ये कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. तसेच दुर्गंधीही येत होती. त्यामुळे गावंडे यांनी कपाशीच्या शेतामध्ये जावून पाहणी केली असता, त्या ठिकाणी त्यांना एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावंडे यांनी तत्काळा या घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली. पुढे पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर भोकरदन पोलीस उपविभागीय अधिकारी सुनिल जायभाये, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, बिट जमादार नागरगोजे यांनी घटनास्थळी दाखल होवून पाहणी केली.
महिलेचा मृतदेह सहा ते सात दिवसांपासून घटनास्थळी टाकण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. कपाशीच्या शेतामध्ये कोणत्याही झाडांची मोडतोड झालेली नाही. तसेच महिलेचा चेहरा सुजल्याने ओळखू येत नाही. त्यामुळे मृत महिलेची ओळख पटवण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी औरंगाबादला पाठविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.