जालना - अंबडच्या जामखेड शिवारात एका महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुभद्राबाई पंढरीनाथ मस्के असे या 50 वर्षीय शेतकरी महिलेचे नाव आहे.
सुभद्रा मस्के या नेहमीप्रमाणे कापूस वेचणीसाठी त्यांच्या शेतात गेल्या होत्या. मात्र रात्रीपर्यंत त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शेतामध्ये जाऊन शोधाशोध सुरू केली. त्या दरम्यान त्यांचे शरीरापासून वेगळे झालेले धड आणि तुटलेले अन्य अवयव दिसले. वन्यप्राण्याने हा हल्ला केला असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अंबड वन विभागाचे वनाधिकारी अभय अटकल घटनास्थळी पोहोचले आहेत. मात्र हा हल्ला प्राण्याने केला की घातपात, याविषयी आत्ताच सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल.