जालना - वनविभाग आणि वन संशोधन केंद्राच्यावतीने जालना येथील वनविभागाच्या परिसरात वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात असलेले हरिण, नीलगाय, मोर, आदि पक्षी आणि वन्यजीव यांना दिलासा मिळाला असून संध्याकाळच्या वेळी नागरिकही हे प्राणी पाहण्यासाठी जात आहेत.
मागील महिन्यात पाण्याच्या शोधात असलेल्या सहा हरणांचा, शेळ्यांचा आणि गाईंचा विषारी पाणी पिल्यामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभाग आणि वन संशोधन केंद्राने त्यांच्या परिसरात असलेल्या पानवठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले आहे. तसेच वनसंशोधन केंद्रच्या बाजूला माणसाळलेल्या प्राण्यांसाठी उथळ हौद केला आहे. त्यामुळे जे प्राणी माणसात मिसळतात असे प्राणी येथे येऊन पाणी पित आहेत.
त्याच सोबत वनविभागाच्या मध्यभागी देखील पाण्यासाठी मोठे हौद,पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. येथे जे प्राणी माणसापासून दूर पळतात अशा प्राण्यांची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये नील गाय, हरिण आदी वन्य प्राण्यांचा समावेश आहे. या परिसरात नील गाईंचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. तसेच हरीण, काळवीट देखील येथे मुक्त संचार करताना दिसतात. भर उन्हामध्ये झाडांच्या गार सावलीला आराम करताना मोर देखील नजरेस पडतात. वनविभागाच्या वतीने प्राण्यांसाठी केलेल्या या पाण्याच्या व्यवस्थेबद्दल प्राणीमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे.