जालना- जिल्ह्यातील पाणी साठवणीचे ७ मध्यम तर ५७ लघु प्रकल्प कोरडेठाक पडण्याची चिन्हे आहेत. सध्यस्थितीत एकूण ६४ प्रकल्पांमध्ये ४३% जलसाठा आहे. या जलसाठ्याची उपयुक्तता फक्त ०.१८ टक्के एवढीच आहे. दरम्यान गेल्या वर्षी ३० मे'ला या प्रकल्पांमध्ये बारा टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता.
जालना जिल्ह्यामध्ये ७ मध्यम प्रकल्प आहेत. त्यामध्ये जालना तालुक्यात कल्याण गिरजा प्रकल्प, कल्याण मध्यम प्रकल्प. बदनापूर तालुक्यात अप्पर दुधना प्रकल्प, भोकरदन तालुक्यात जुई मध्यम आणि धामणी मध्यम प्रकल्प. जाफराबाद तालुक्यात जीवरेखा मध्यम प्रकल्प आणि अंबड तालुक्यात गल्हाटी मध्यम प्रकल्प असे एकूण सात मध्यम प्रकल्प आहेत.या सात प्रकल्पांपैकी गलाटी, धामणा मध्यम, आणि जुई हे तिन्ही प्रकल्प कोरडेठाक पडले असून उर्वरित चारही प्रकल्प पुढील आठवड्यात कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे. यामुळे जालना जिल्ह्यात यावर्षी एकाही मध्यम किंवा लघु प्रकल्पामध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक राहणार नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब तलावांमध्ये साठविणे गरजेचे झाले आहे. या तलावांमध्ये मागील वर्षी १०.२८% जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे मार्च महिन्यापर्यंत कसेबसे पाणी मिळाले. परंतु यावर्षी आजच्या तारखेनुसार या जलसाठ्यात एकही थेंब नाही. त्यामुळे आता जो पाऊस पडेल त्या साठवणीवर पुढील वर्षाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.
जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ७७.८८ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. त्यापैकी ६८.५० दशलक्ष घनमीटर पाणी हे वापरासाठी उपयुक्त होऊ शकते, तसेच ५७ प्रकल्पांमध्ये ११५.३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊन १६९.०९ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी वापरण्यासाठी उपयुक्त होऊ शकते. सध्यस्थितीत ६४ पैकी ५४ प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उर्वरित दहा प्रकल्प पुढील आठ दिवसांमध्ये कोरडेठाक पडण्याची शक्यता लघुसिंचन प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.