जालना - अंगात असलेल्या कलाकुसरीने, मेहनतीने, जनतेच्या घरात महालक्ष्मी उभ्या करण्यासाठी लागणाऱ्या कोठ्या तयार करण्यामध्ये आम्हाला समाधान मिळते, निश्चितच याचा आम्हाला आनंद आहे, मिळालेल्या उत्पन्नातून उपजीविका ही भागते. मात्र, भविष्य नसल्यामुळे कधीकधी चिंताही खायला उठते. त्यामुळे शासनाने जर या समाजाकडे लक्ष दिले, तर निश्चितच लक्ष्मीची पावले आमच्या घरीही पडतील, अशी अपेक्षा वैदू समाजातील तरुणांनी व्यक्त केली आहे.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील हट्ट या गावचा वैदू समाज दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जालना शहरांमध्ये महालक्ष्मीसाठी लागणाऱ्या कोठ्या बनवून देण्यासाठी आला आहे. 5 सप्टेंबरला ज्येष्ठ गौरींचे म्हणजेच महालक्ष्मीचे आगमन होत आहे. त्यापूर्वी या कोठ्या तयार करून विकण्याचे काम हा समाज करतो. असेच काम बाबू एकनाथ धोत्रे, हा दहावी पास झालेला तरुण करतो. त्याला गावातील बँक कर्ज देत नसल्यामुळे आपला पारंपरिक व्यवसाय करावा लागत असल्याचे तो सांगतो. त्याची शासनाकडून कर्ज मिळवून लहान मोठा व्यवसाय करण्याची इच्छा आहे, मात्र भटकंती करणाऱ्या या समाजाकडे एकसंधपणा नसल्यामुळे कोणीही त्यांना थारा देत नाही.
त्यामुळे हे लोक कोठ्या बनवतात. यामध्ये महालक्ष्मीचा 1 जोड आणि पिलवनडाचा 1 जोड, असे 4 नग सुमारे दीड हजारापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे तरुण काम करत असताना महिला देखील संसारामध्ये मदत करतात. त्या सुया, पोत विकण्याचे काम करतात. त्यामुळे हे लोक दोघांच्या उत्पन्नावर आपली उपजीविका भागवतात आणि हंगामामध्ये कमवलेला पैसा ते उर्वरित वर्षभर वापरतात.
वर्षातून 4 ते 6 महिने ते गावातच उदरनिर्वाह करतात. दसरा, दिवाळीला आपल्या घरीच आनंदोत्सव साजरा करून आर्थिक टंचाई सुरू झाली की, परत व्यवसायाला सुरुवात करतात. हंगामा व्यतिरिक्त इतर वेळेत ते डबे, चाळन्या तयार करण्याचे काम करतात.