जालना - "वरातीमागून घोडे" या म्हणीला साजेसे असे केंद्राचे पथक काल सोमवारपासून जालना जिल्ह्यात तळ ठोकून आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी हे दोन सदस्यीय पथक करत आहे.
आज (मंगळवारी) दुसऱ्या दिवशी जालना तालुक्यातील गोलापान्ग्री जवळ असलेल्या गणेशनगर येथील शशिकला बाई कावळे यांच्या शेताची त्यांनी पाहणी केली. या दरम्यान त्यांन जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांना विचारलेल्या प्रश्नांमुळे शिंदे यांची चांगलीच भांबेरी उडाली. पथकाला योग्य माहिती मिळत नसल्याची बाब जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या मध्यस्थीने हा पाहणी दौरा आटोपता घेतला गेला.
केंद्राच्या पथकाचा चिकित्सक अभ्यास
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर ओस पडलेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांनी आता पुन्हा दुसरे पीक घेतले आहे. त्याची परिस्थिती चांगली आहे. तब्बल तीन महिन्यानंतर आलेल्या या पथकाला शेतामध्ये पिकांची परिस्थिती चांगली दिसत आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी काय परिस्थिती होती? हे जाणून घेण्यासाठी पथक चिकित्सक प्रश्न विचारत आहे. मात्र, तीन महिन्यापूर्वीच या परिस्थितीची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे हे यांना पथकाला देता आली नाही. त्यावेळी किती पाऊस झाला? किती दिवस झाला? किती मिलिमीटर झाला? या प्रश्नांची उत्तरे शिंदे यांच्याकडे नव्हती. तसेच जिल्ह्यातून वाहणाऱ्या कोण-कोणत्या नद्यांचे पाणी शेतामध्ये घुसून शेतीचे नुकसान झाले असल्याचे आकडेवारी देखील या पथकाला मिळाली नाही.
हेही वाचा - कोरोनावर मात केलेल्या रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले; निमोनिया, श्वसनाचे विकार, सांधेदुखीचा त्रास
दरम्यान पथक तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याकडून माहिती घेत असताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा हे अधिकारीदेखील उपस्थित होते. मात्र, त्यांच्याशी संबंधित हा विषय नसल्यामुळे त्यांनी बाजूला उभे राहून पथक आणि कृषी अधीक्षक यांच्यात होणारी प्रश्नोत्तरांची जुगलबंदी पाहिली. आलेल्या केंद्रीय पथकाला जिल्हा अधीक्षक बाळासाहेब शिंदे यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नसल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी हस्तक्षेप करून दौरा आटोपता घ्यायला घेण्यासाठी सूचना केल्या.
केंद्रीय पथक नाराज -
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर केंद्रीय पथक आपल्या ताफ्याकडे रवाना झाले. त्याचदरम्यान त्यांना योग्य उत्तर मिळाले नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांना मनविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा ताफा पुढे शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाला. यानंतर पुन्हा एक बैठक झाली. या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नव्हता. आजच्या या पाहणी दौऱ्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंडलाधिकारी हरी गिरी, तलाठी शांतीलाल खरात, कृषी पर्यवेक्षक घोरपडे, शेतकरी नंदू रामभाऊ कावळे, यांची उपस्थिती होती.