जालना - कोरोनामुक्त असलेल्या बदनापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे गुरुवारी स्प्ष्ट झाले आहे. बदनापूर शहरातील दोन व्यापाऱ्यांना कोरोना लागण झाल्याने नगर पंचायत, आरोग्य विभाग व पोलीस विभागाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आज (शुक्रवार) कोरोनाग्रस्त ठरलेल्या बाजारगल्ली व शिवाजी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत सील करण्यात आलेल्या भागात ४ नर्स आणि २० आरोग्य सेविका पीपीई किट धारण करून दाखल झाल्या. त्यांनी या भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात केली असून ते जवळपास ५०० नागरिकांची तपासणी करणार आहेत. यावेळी तहसीलदार संतोष बनकर यांनी सील केलेल्या भागाला भेट देऊन पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
![कोरोनाग्रस्त भागाची पाहणी करताना अधिकारी वर्ग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02:52_mh-jln-01-corona-mhc10039_29052020140715_2905f_1590741435_58.jpg)
जालना-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बदनापूर तालुक्यावर सर्वांचे लक्ष केंद्रित झालेले होते. कारण औरंगाबाद जिल्हा हा कोरोना महामारीमुळे रेड झोन घोषित झालेला आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन ३ पर्यंत बदनापूर तालुका सुरक्षित होता. मात्र, लॉकडाऊन ४ संपण्याच्या वाटेवर असताना गुरुवारी बदनापूर शहरातील एका ६५ वर्षीय व्यापाऱ्याचा औरंगाबाद येथे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त येऊन धडकले. त्या पाठोपाठ अन्य एका ३० वर्षीय व्यापाऱ्याचा जालना येथे अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच शहरात खळबळ माजली. त्यांनतर, बदनापूर पोलीस निरीक्षक एमबी खेडकर, नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, पाणी पुरवठा अभियंता गणेश ठुबे, नगर अध्यक्ष प्रदीप साबळे, नगरसेवक संतोष पवार, राजेंद्र जैस्वाल आदींनी धावपळ करत बालाजी मंदिर ते मुस्लिम कब्रस्तान पर्यंतची बाजार गल्ली आणि शिवाजी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंतचा भाग तातडीने सील केला. तसेच, या भागातील नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना नगर पंचायत कर्मचारी रशीद पठाण मौलाना, अशोक बोकन यांनी दिल्या.
![कोरोनाग्रस्त भागात दाखल झालेले आरोग्य पथक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02:52_mh-jln-01-corona-mhc10039_29052020140715_2905f_1590741435_671.jpg)
शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज (शुक्रवार) पोलीस निरीक्षक एमबी खेडकर, मुख्य अधिकारी डॉ.पल्लवी अंभोरे, आरोग्य सभापती संतोष पवार, कोव्हिड-१९ अधिकारी गणेश ठुबे यांनी आरोग्य विभागाला सील केलेल्या भागातील नागरिकांची तातडीने आरोग्य तपासणी करण्याची विनंती केली. यावेळी ४ नर्स व २० आरोग्यसेविकांचे पथक पीपीई किट धारण करून सील केलेल्या भागात दाखल झाले. हे पथक ५०० नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. त्यामुळे शहरातील इतर नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तसेच सील केलेल्या भागाला प्रभारी तहसीलदार संतोष बनकर व पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तर, नगर अध्यक्ष प्रदीप साबळे, आरोग्य सभापती संतोष पवार, राजेंद्र जैस्वाल यांनी नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.