जालना - नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग जालन्यातून जात आहे. या समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आले आहेत. जालन्यापासून जवळच असलेल्या निधोना गावाजवळ दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी हे मजूर राहतात. आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास एक हायवा ट्रक त्यांच्या घरात घुसला. त्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
बहुपदरी असलेला समृद्धी महामार्ग प्रचंड रुंद आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात मोकळी जागा आहे. निधोना गावाजवळ समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या पुलाचेही काम चालू आहे. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कामगारांनी दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पत्रे ठोकून निवारा केला होता. दिवसभराचे काम आटोपून रात्री बारा वाजताच्या सुमारास या पत्र्यांच्या निवाऱ्यामध्ये आठ कामगार झोपले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास एक रिकामा हायवा ट्रक भरधाव वेगात आला आणि सरळ या पत्र्यांच्या घरात घुसला. काय होतेय हे कळण्याच्या अगोदरच एकाला जीव गमवावा लागला. तर, दुसरा एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावला. अन्य दोन-तीन जण जखमीही झाले आहेत.
ठार झालेले कामगार मध्यप्रदेशचे
या अपघात प्रकरणी राजकुमार छकु भुमिया (रा. बंजर बरेला, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश) याने चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार राजकुमारचा एक मोठा सख्खा भाऊ आणि एक चुलत भाऊ धनिकराम भुमिया, मुकेश गोरीलाल भुमिया, दयाराम बुद्धी सिंग विश्वकर्मा, रुस्तुमपाल किशोरपाल हे सर्वजण एका खोलीत आणि अन्य काही जण शेजारच्या खोलीत झोपले होते. याच दरम्यान आंबेडकरवाडी समोर समृद्धी महामार्गावरून एक हायवा ट्रक जात असताना तो सरळ या पत्र्याच्या शेडमध्ये घुसला. यामध्ये धनीकराम छकु भुमिया (वय 22) या राजकुमारच्या सख्ख्या भावाच्या आणि मुकेश गोरीलाल भुमिया (वय 22) या त्याच्या चुलत भावाच्या अंगावर हायवा गेला. हायवा क्रमांक जी. जे. 10 टी एक्स 6609 चालकाचे निष्काळजीपणाने वाहन चालवणे दोघांचा बळी घेण्यास कारणीभूत ठरले असल्याची तक्रार राजकुमारने दिली आहे. यामध्ये धनीकराम हा तरुण जागीच मरण पावला. तर, मुकेश या तरुणाचा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. उर्वरित कामगारांमध्ये रुस्तुम पाल, रामकिशोर पाल, दयाराम बुद्धी सिंग विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कामगारांनी केले स्थलांतर
ज्या ठिकाणी सकाळी अपघात झाला, या ठिकाणी हायवा घुसल्यामुळे सर्व सामानाची तोडफोड झालेलीच होती. त्यामुळे येथील कामगारांनी हे ठिकाण बदलले आहे. ज्या घरांमध्ये हा अपघात झाला, त्या घरांमध्ये आणि शेजारी मध्यप्रदेश आणि अन्य राज्यातील फक्त पुरुष मंडळी राहत होती. या सर्व कामगारांमध्ये सर्वजण तरुण असून त्यांचे वय चाळीस वर्षाच्या आतील आहे.