जालना - गुरुवारी दहशतवादी हल्ल्यांमध्ये वीरमरण पावलेले बुलढाणा जिल्ह्यातील चोरपांग्रा (गोवर्धन नगर तांडा) येथील जवान नितीन राठोड यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील असंख्य चाहत्यांसोबत गोवर्धननगर तांड्यातील तान्ह्या बाळापासून ते समाजापासून अलिप्त असलेले 'किन्नर'देखील उपस्थित होते. एक सच्चा देशभक्त वीरमरण पावल्यामुळे त्यांनीदेखील आपली भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी अर्पण केली.
औरंगाबाद विमानतळावर पार्थिव उतरल्यानंतर दुपारी सुमारे पावणेचार वाजता वीरमरण आलेल्या जवान नितीन राठोड यांचे पार्थिव त्यांच्या गोवर्धननगर तांडा येथील घरी पोहोचले. त्यानंतर नातेवाईक आणि आप्तेष्टांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ४ वाजून २० मिनिटांनी जवान नीतीन राठोड अंत्ययात्रा सुरू झाली. घरापासून जवळच असलेल्या आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत घेतले त्या शाळेच्या समोर असलेल्या भव्य प्रांगणावर पावणेपाच वाजता अंत्ययात्रा पोहोचली.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
नितीन राठोड यांना अग्नी दिलेला पाहून जवानाच्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला. जवानाची बहीण, पत्नी आणि त्यांचे वडील यांना शोक अनावर झाल्याने त्यांनी जवानाच्या चितेकडे धाव घेतली. मात्र, वेळीच त्यांना थांबविण्यात आले. पंचक्रोशीतील असंख्य जनता वारुळातून मुंग्या याव्यात तशा पद्धतीने मिळेल त्या वाटेने, मिळेल त्या वाहनाने येथे जमा झाली होती. अंत्यविधीला लागणारा वेळ पाहून परिसरात असलेल्या झाडांखाली जवानांच्या आठवणीने हुंदके भर भरून येत होते. अंत्यविधीच्या वेळी मात्र अपुऱ्या जागेमुळे झाडावर बसून, शाळेवर चढून आणि मिळेल त्या पद्धतीने आपल्या लाडक्या जवानाचे दर्शन घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता. ग्रामीण भाग असूनही या वीरमरण पावलेल्या जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ५ तास हे चाहते उन्हामध्ये ताटकळत बसले होते.
दरम्यान, राज्य शासनाच्यावतीने वीरमरण आलेल्या जवानाच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी मदत संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. वीरमरण आलेल्या जवानाच्या पत्नीला ३० लाख रुपये, त्यांच्या आईला १० लाख रुपये आणि वडिलांना १० लाख रुपये असे एकूण ५० लाख रुपयांचा निधी कुटुंबीयांना देण्यात आला.
अंत्यसंस्काराच्यावेळी सिंदखेडचे आमदार शशिकांत खेडेकर, लोणार मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, खासदार प्रतापराव जाधव, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, महाराष्ट्र शासन स्थापित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य, पंढरपूर तथा वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश बुवा जवंजाळ, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्वेता महाले, जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुलढाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंग दुबे, उपविभागीय अधिकारी राजेश पारनाईक, लोणारचे तहसीलदार सुरेश कवळे, मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर पैंजणे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)