जालना - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजतापासून सुरूवात होणार आहे. मतमोजणी ठिकाणच्या पार्किंगचा पोलीस वाहतूक शाखेने नकाशा जारी केला आहे. त्यामुळे मतमोजणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसह कार्यकर्त्यांना देखील आपली वाहने सुरळीत लावण्यासाठी मदत होणार आहे.
जालना शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर औरंगाबाद-जालना महामार्गावर ही मतमोजणी होणार आहे. या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ लक्षात घेता, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी मतमोजणी ठिकाणचा नकाशा जनतेसाठी जारी केला आहे. या नकाशामध्ये मतमोजणीचे ठिकाण, त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि दुचाकी वा चारचाकी वाहनांना पार्किंगची केलेली व्यवस्था दर्शविण्यात आली आहे. या नकाशामुळे जालन्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांना कर्मचाऱ्यांना महिको कंपनीच्या बाजुलाच आपली वाहने लावावी लागणार आहेत. तेथून मतदान मतमोजणी केंद्रामध्ये रस्ता ओलांडून प्रवेश करावा लागणार आहे. वाहनतळाचे पूर्व नियोजन केल्यामुळे पोलिसांचा आणि वाहनधारकांचा ताण कमी होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक काकडे यांनी व्यक्त केला आहे.