बदनापूर (जालना) - शेताच्या बाजूलाच बनलेल्या पाझर तलावात गुरूवारच्या (दि. 9 जून) पावसाने 5 ते 6 फूट पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून एकाच कुटुंबातील तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कुसळी येथे घडली. सख्खे भाऊ बहिण व एक चुलत भावाचा यात समावेश आहे. ही घटना आज (दि. 10 जून) दुपारी 4 च्या दरम्यान घडली. मनोज, दिपाली व आकाश हे मृत झालेल्या तिन्ही बालकांची नावे आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्याने 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले -
कुसळी गावाजवळच शेतवस्तीवर अंकुश वैद्य व संजय वैद्य हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबियांसह राहतात. शेतकऱ्यांच्या शेतीशेजारीच बैलभरा शिवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील नाल्यावर पाझर तलाव क्रमांक 1 निर्माण करण्यात आलेला आहे. या छोटयाशा नाल्यावर गायरान जमिनीवर बनलेल्या या पाझर तलावाला 9 जूनला झालेल्या पावसामुळे 5 ते सहा फूट पाणी साचलेले होते. वैद्य कुटुंबिय नेहमीप्रमाणे शेतीचे काम करत असतानाच या कुटुंबातील मनोज अंकुश वैद्य (वय 11), दिपाली अंकुश वैद्य (वय 10), आकाश संजय वैद्य (वय 7) हे तिघे खेळत खेळत या तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने 5 ते 6 फूट पाण्यात बुडाले.
तोपर्यंत या बालकांचा मृत्यू -
शेतीकामात मश्गुल असलेल्या वैद्य कुटुंबियांना मुले दिसत नसल्यामुळे त्यांनी पाझर तलाव व इतरत्र या मुलांचा शोध सुरू केला असता त्यांना ही घटना दिसली. विशेष म्हणजे दोन्ही शेतकरी अल्पभूधारक असून दोघांनाही एक एक एकर शेतजमीन आहे. ही घटना समजताच आरडाओरड झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांसह सरपंच भाऊसाहेब वैद्य, संदीप वैद्य, राजेंद्र वैद्य, बाबासाहेब वैद्य आदींनी मदतकार्य करून मोठया परिश्रमानंतर बालकांना तलावात बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या बालकांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृत बालकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या शेतकरी कुटुंबियांवर अचानक कोसळलेल्या या आपत्तीमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.