जालना - राजूर ते पैठण तीर्थक्षेत्रातंर्गत बनवण्यात आलेल्या मार्गावरील नानेगाव येथे लहुकी नदीवरील निर्माणाधीन पुलाच्या नजीकचा रस्ता दुसऱ्यांदा वाहून गेल्याने या भागातील गावकऱ्यांचा संपर्क तुटला आहे. पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने हा रस्ता वाहून गेला होता. त्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात नळ्या टाकून डागडुजी करून हा रस्ता पुन्हा बनवण्यात आला. मात्र, शुक्रवारी रात्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने रस्ता पुन्हा वाहून गेला. यामुळे आज वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय.
बदनापूर तालुक्यातील रोषणगाव मंडळात गुरुवारच्या पहाटे अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांत पाणी शिरले होते. नानेगावर येथे राजूर ते पैठण तीर्थक्षेत्रांतर्गत रस्ता निर्माणाधीन आहे. वाहतुकीची तात्पुरती सोय करण्यासाठी या ठिकाणी कच्चा रस्ता बनवण्यात आलाय. या रस्त्यावरील लहुकी नदीवर पुलाचे काम सुरू आहे. गुरुवारच्या अतिवृष्टीत हा संपूर्ण रस्ता वाहून गेला. त्यानंतर कंत्राटदाराने या ठिकाणचे पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंटचे पाईप टाकून व मुरुम पसरवून संबंधित मार्गाची डागडूजी केली.
शुक्रवारी रात्री लहुकी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी आले. त्यामुळे तात्पुरता रस्ता वाहून गेला. त्यातच रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे हे नियोजित दौऱ्यानिमित्त या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. यासाठी सकाळपासून कंत्राटदाराने या तात्पुरत्या पुलाची पुन्हा डागडुजी सुरू केली होती. मात्र, या रेंगाळलेल्या कामामुळे गावांचा संपर्क तुटलाय.